गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:46+5:302021-08-17T04:14:46+5:30
पुणे : गुंतवणुकीच्या रकमेवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून ५४ गुंतवणूकदारांची ४३ कोटी ३ लाख ४२ हजार १३३ रुपयांची ...
पुणे : गुंतवणुकीच्या रकमेवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून ५४ गुंतवणूकदारांची ४३ कोटी ३ लाख ४२ हजार १३३ रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी फेटाळला.
पंकज भागचंद छल्लाणी (वय ४६, रा. रघुवीर सोसायटी, मुकुंदनगर) असे जामीन अर्ज फेटाळलेल्याचे नाव आहे. रिचर्ड वसंत अंची (वय ५८, रा. भोसलेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा रस्त्यावरील टाईम्स स्क्वेअर इमारतीमधील कार्यालयात नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपीने फिर्यादींना गुंतवलेल्या रकमेवर १८ ते २४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले. तसेच, नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ६५ लाख रुपये ठेव म्हणून घेतले. तसेच, मार्च २०१८ पासून ठेव रक्कम व त्यावरील व्याज न देता फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीप्रमाणे ५६ गुंतवणूकदारांची ४३ कोटी ३ लाख ४२ हजार १३३ रुपयांची फसवणूक केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे.