दोषारोपपत्र दाखल न केल्याने बनावट कागदपत्रे बनविणाऱ्यास जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:17+5:302021-05-24T04:10:17+5:30
पुणे - बनावट शिक्के, कागदपत्रे वापरून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बनावट आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, इन्शुरन्स आणि पोलीस क्लिअरन्स बनवून ...
पुणे - बनावट शिक्के, कागदपत्रे वापरून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बनावट आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, इन्शुरन्स आणि पोलीस क्लिअरन्स बनवून दिल्या प्रकरणात न्यायालयाने एकाला जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एन. मुजावर यांनी हा डिफॉल्ट जामीन मंजूर केला आहे.
तुकाराम अर्जुन मगर (वय ३०, रा. काळेवाडी फाटा) असे जामीन मिळालेल्याचे नाव आहे. त्याने अॅड. राहुल नायर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पोलीस नाईक महेश बारकुले यांनी याबाबत वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. ४ मार्च रोजी हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी १ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बनावट आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, इन्शुरन्स आणि पोलीस क्लिअरन्स बनवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात ५ जणांवर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी वेळेत म्हणजे ६० दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याने मगर याने अँड. राहुल नायर यांच्यामार्फत डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.