रवींद्र बऱ्हाटेला फरार कालावधीत आश्रय देणाऱ्या वकिलाला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:11 AM2021-09-11T04:11:24+5:302021-09-11T04:11:24+5:30
पुणे: एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेल्या ...
पुणे: एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेल्या वकिलाला मकोका न्यायालयाने १५ हजार रुपयांचा जामीन दिला आहे. 'तो निष्पाप आहे. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. त्याला मकोका लागू होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्यावतीने करण्यात आला . तो ग्राह्य धरीत अंतर्गत तपासासाठी त्याच्या ताब्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
ॲड. सागर संजय म्हस्के ( वय ३२ रा.म्हस्के वस्ती, आळंदी रस्ता) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. तुषार चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यांना ॲड. विपिन मिश्रा आणि ॲड. शंकर कदम यांनी सहाय्य केले. या गुन्ह्यात बऱ्हाटे, त्याची पत्नी, मुलासह २१ जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तो फरार असताना आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे ॲड. सागर म्हस्के याच्या घरात राहात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ॲड. सागर याला अटक केली आहे. त्याच्यावरही मकोका, ॲट्रासिटीसह भादंविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला. साक्षीदारांशी संपर्क करायचा नाही, गुन्हे शाखा एकचे पोलीस बोलावतील त्यावेळी तपासास हजर राहण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.
----------------------------------------------