रवींद्र बऱ्हाटेच्या मुलासह पत्नी आणि वकिलाला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:26+5:302021-07-14T04:12:26+5:30
पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र बऱ्हाटे याला मदत केल्याप्रकरणी अटक केलेल्या त्याच्या मुलासह पत्नी आणि वकिलाला न्यायालयाने ...
पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी रवींद्र बऱ्हाटे याला मदत केल्याप्रकरणी अटक केलेल्या त्याच्या मुलासह पत्नी आणि वकिलाला न्यायालयाने पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. तिघांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू होत नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.
रवींद्र बऱ्हाटेचा मुलगा मयूर, पत्नी संगीता (वय ४९, रा. धनकवडी) आणि वकील सुनील अशोक मोरे (४९) अशी जामीन झालेल्या तिघांची नावे आहेत. वकील मोरे यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र दौंडकर आणि अॅड. तुषार चव्हाण यांनी, तर मुलगा आणि पत्नीच्या वतीने अॅड. तुषार चव्हाण यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. जमिनीच्या व्यवहारात अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचा आरोप असलेला बऱ्हाटे सुमारे दीड वर्षे फरार होता. त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. त्याला व्हिडीओ अपडेट करणे, फरार होण्यास मदत केल्याचा आरोप तिघांवर होता. दरम्यान, रवींद्र बऱ्हाटे सध्या पोलीस कोठडीत आहे.