कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यातील मुख्य आरोपीला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:02 AM2022-07-28T10:02:28+5:302022-07-28T10:04:14+5:30
यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती...
पुणे : महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कडकनाथ कोंबडीपालन व्यवसाय घोटाळ्याचा सूत्रधार सुधीर कापरे याला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
महारयत अँग्रो इंडिया या कंपनीच्या माध्यमातून आरोपीने कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये गुंतवणूक करून वर्षभरात दोन लाखांहून अधिक रकमेचा फायदा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार १९७ गुंतवणूकदारांनी ५ कोटी ८२ लाख २६ हजार रुपयांच्या रकमेची गुंतवणूक केली. मात्र, त्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी कापरे विरोधात दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. कापरे याला याप्रकरणात ७ सप्टेंबर २०२१ रोजी अटक केली होती. कापरे याचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्याने ॲड. अनिकेत निकम यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
सुधीर कापरे याने कुठल्याही शेतकऱ्याला आमिष दाखवलेले नाही. तपासात देखील तसे आढळले नाही. आरोपी कापरे हा महारयत या कंपनीमध्ये संचालक देखील नव्हता व तो फक्त या कंपनीला अंडी पुरवण्याचे काम करीत होता, असा युक्तिवाद अँड निकम यांनी केला. सरकारी वकील तिडके यांनी जामिनाला विरोध केला. मात्र, न्यायाधीश. एन. जे. जमादार न्यायालयाने कापरे याला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीने न्यायालयाच्या परवानगीशिवाय सांगली, सातारा आणि पुण्याची हद्द दोन वर्षे आणि सुनावणी पूर्ण होईपर्यंत ओलांडायची नाही तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत हजेरी लावावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.