बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 10:07 AM2022-08-26T10:07:27+5:302022-08-26T10:09:40+5:30
गणेश जगदाळे टोळीने ६ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडीत गोळीबार केला होता....
पुणे :बिबवेवाडी परिसरात गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या १३ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यातील आकाश शिळीमकर, शुभम रोकडे, रोहन लोंढे, अजय आखाडे या चौघांना जामीन मंजूर झाला आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निर्णय दिला.
पूर्ववैमनस्यातून गणेश जगदाळे टोळीने ६ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटीत मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर दोन गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कोयते, दांडके आणि पिस्तूल हातात घेऊन दुचाकीवरून फिरत परिसरात दहशत निर्माण केली होती.
बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून १३ जणांना अटक केली. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. आरोपीचे नाव एफआयआरमध्ये नाही, तसेच इतर कोणताही गुन्हा त्यांच्यावर दाखल नाही. त्यामुळे त्यांचे विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करता येणार नाही, असा ॲड. अमेय सिरसीकर, ॲड. प्रसाद रेणुसे यांनी युक्तिवाद केला. सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरून चौघांना जामीन मंजूर केला.