बारामती येथील बनावट रेमडेसिविर प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 07:09 PM2021-08-05T19:09:21+5:302021-08-05T19:10:06+5:30
बारामती येथील बनावट रेमडेसिवीर प्रकरणातील टोळीने पॅरासिटीमॉलचे पाणी रेमिडेसिविरच्या मोकळ्या इंजेक्शनमध्ये भरून विकले होते. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.
बारामती : बारामती येथील बनावट रेमडेसिवीर प्रकरणातील आरोपींचा जामीन बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या टोळीने पॅरासिटीमॉलचे पाणी रेमिडेसिविरच्या मोकळ्या इंजेक्शनमध्ये भरून विकले होते. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यावरून सापळा रचून बारामती ग्रामीण पोलिसांनी या टोळीला एका डॉक्टरसह ताब्यात घेतले होते. आरोपींनी जामिनासाठी केलेला अर्ज गुरूवारी (दि. ५) बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.
या प्रकरणातील प्रशांत घरत, दिलीप गायकवाड, शंकर दादा भिसे या तीन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश एस.टी. भालेराव यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी सरकारची बाजू मांडताना या गुन्ह्यात एका निरपराध रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने यातील आरोपींना जामीन देऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या तिघांचा जामीन अर्ज फेटाळला.
तीन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वत्र हाहा:कार माजवला होता. याच दरम्यान रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. नातेवाईकांच्या हतबलतेचा फायदा घेत आरोपींनी रेमडेसिवीरच्या मोकळ्या झालेल्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉलचे पाणी भरून भरमसाठ किमतीला विकले जात होते. बारामती ग्रामीण पोलिसांनी बनावट रेमडेसिविर इंजेक्शन तयार करुन विकणारी टोळी रंगेहाथ पकडली होती. पोलिसांनी त्यासाठी 'स्टिंग ऑपरेशन' राबविले होते. कोरोना संकट काळात रेमडेसिविरची मोठ्या प्रमाणात मागणी असताना या टोळीने पॅरासिटोमॉल गोळ्यांचे पाणी तयार करत ते कुपीत भरून विकण्याचा धंदा सुरु केला होता. ३० ते ३५ हजार रुपयांना एक इंजेक्शन विकले जात असल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली होती. या बनावट इंजेक्शनमुळे पवारवाडी (ता. फलटण) येथील स्वप्निल जाधव या कोरोनाबाधिताला आपला जीव गमवावा लागला होता.
या प्रकरणात काटेवाडीजवळील मासाळवाडी येथील दिलीप ज्ञानदेव गायकवाड याच्यासह प्रशांत घरत (रा. भवानीनगर), शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. कसबा, बारामती), दयानंद उद्धव गोसावी व कृष्णा शशीराव जेवाडे (रा. जवाहरनगर, इंदापूर रोड, बारामती) यांच्यासह डॉ. स्वप्निल नरुटे व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या टोळीविरोधात यापूर्वी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील आरोपी डॉ. स्वप्नील नरुटे याला दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे, अशी माहिती एपीआय महेश विधाते यांनी दिली.