India Post | अवघ्या ३९९ रुपयांत मिळवा १० लाखांचा विमा; सामान्य नागरिकांसाठी खास योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:54 PM2023-01-13T14:54:48+5:302023-01-13T14:55:30+5:30
ही योजना १८ ते ६५ वयांतील व्यक्तींसाठी आहे...
पुणे : टपाल कार्यालयातर्फे सामान्य नागरिकांसाठी खास बजाज एलायंज या विमा कंपनीकडून विमा योजना सुरू केली आहे. त्यामध्ये केवळ ३९९ वार्षिक हप्ता असून, विमाधारकास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
टपाल खात्याच्या या योजनेचा गरीब व मध्यमवर्गातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. हा मोठा वर्ग आतापर्यंत स्वस्तातील विमा योजनेच्या प्रतीक्षेत होता. या विमा योजनेला टपाल खात्याची विश्वासार्हता मिळालेली आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण धारकास मिळणार आहे. ही योजना १८ ते ६५ वयांतील व्यक्तींसाठी आहे. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयांतर्गत व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी टपाल खाते आणि विमा कंपनीत सामंजस्य करार झाला आहे. ही योजना प्रत्येक टपाल कार्यालयांतर्गत अटी व शर्तींसह तुम्हाला विमा संरक्षण देईल.
या योजनेत व्यक्तीला अवघ्या ३९९ रुपयांच्या हप्त्यामध्ये एका वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास ३० हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येतो.
तसेच रुग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवस तुम्हाला प्रतिदिन एक हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. कुटुंबाला वाहतुकीसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च मिळतो. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये व या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते.
योजनेचा कालावधी
या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करता येते.
असा करा अर्ज
तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन तिथे अर्ज भरू शकता. पोस्टात तुमचे बँक खाते असेल तर त्याअंतर्गतदेखील अर्ज सादर करू शकता.