‘बाजी’गरांचा तरुणाईशी संवाद
By Admin | Published: February 5, 2015 12:40 AM2015-02-05T00:40:11+5:302015-02-05T00:40:11+5:30
आकुर्डी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात बाजी या मराठी चित्रपटातील कलावंतांनी तरुणाईशी संवाद साधला.
आकुर्डी : डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ अॅप्लाईड आर्ट अॅण्ड क्राफ्ट महाविद्यालयात उपक्रम
पिंपरी : आकुर्डी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात बाजी या मराठी चित्रपटातील कलावंतांनी तरुणाईशी संवाद साधला. कलाकारांशी संवाद, अनुभव, महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी केलेले कलाकारांचे स्वागत, विद्यार्थ्यांनी दिलेली चित्रमय भेट याने कलाकार भारावले.
आकुर्डी येथील शैक्षणिक संकुलात बाजीची टीम सोमवारी दाखल झाली. ‘लोकमत’ युवा नेक्स्टतर्फे कलाकार भेटीचा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या वेळी संचालक कर्नल एस. के. जोशी यांनी ‘बाजी’ चित्रपटाचे कलाकार श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी यांचे स्वागत केले. या वेळी जितेंद्र जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत तरुणांची मने जिंकली. अमृता खानविलकर यांनी प्रसिद्ध लावणीची झलक दाखवून उपस्थितांची दाद घेतली.
श्रेयस तळपदे यांनी भारदस्त आवाजात विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. बाजी चित्रपट निर्माण करण्यामागील भूमिका विशद केली. विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत बाजी चित्रपटाचे प्रमोशन झाले. या वेळी प्रा. पल्लवी पांढरे उपस्थित होत्या. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ अॅप्लाईड आर्ट आणि क्राफ्टच्या प्रभारी प्राचार्या सुमेधा सहस्रबुद्धे यांनी व त्यांच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ‘बाजी’ चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर कलावंत आपली कला सादर करीत होते, त्या वेळी प्रा. दयानंद हर्षे यांनी कलाकारांचे स्केच तयार केली व त्यांना भेट दिली.
महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी अक्षदा शिंदे
म्हणाल्या, ‘‘कलावंतांशी गप्पा मारण्याच्या उद्देशाने ‘बाजी’ चित्रपटातील कलावंतांची भेट हा कार्यक्रम झाला. त्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. ’’(प्रतिनिधी)