Shobha Bhagwat: बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन
By श्रीकिशन काळे | Published: December 8, 2023 11:18 AM2023-12-08T11:18:10+5:302023-12-08T11:19:06+5:30
सकाळी साडे अकरा ते बारा या वेळेत वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे....
पुणे : बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा अनिल भागवत (वय ७६) यांचे आज सकाळी निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी आभा, मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. आजच सकाळी साडे अकरा ते बारा या वेळेत वैकुंठ स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार होतील.
त्या प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका म्हणून ओळखल्या जात. भागवत या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांनी बालभवन साठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. त्या लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असत. लहान मुलांचे मानसशास्त्र त्या जाणत आणि त्यामुळे त्यांनी बालभवन येथे खूप चांगल्या प्रकारे काम केले. चित्रकार आभा भागवत ही त्यांची मुलगी आहे.
भागवत यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात आपली मुलं (मार्गदर्शनपर), गंमतजत्रा (बालसाहित्य), गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर),बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक - अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे., मुल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन), विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कृष्णकुमार). - मार्गदर्शनपर., सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर) यांचा समावेश आहे.