बाला शेखची सचिन येलभरवर मात

By admin | Published: April 2, 2017 02:48 AM2017-04-02T02:48:01+5:302017-04-02T02:48:01+5:30

येथील जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवाची सांगता शुक्रवारी करमणुकीच्या कार्यक्रमाने झाली

Bala Sheikh beat Sachin over Yel | बाला शेखची सचिन येलभरवर मात

बाला शेखची सचिन येलभरवर मात

Next

तळेगाव दाभाडे : येथील जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवाची सांगता शुक्रवारी करमणुकीच्या कार्यक्रमाने झाली. तळेगावचा वार्षिक उत्सव गुढीपाडव्यास सुरू झाला. सलग चार दिवस विविध धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम पार पडले. निकाली कुस्त्यांचा आखाडा हे या वेळच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत भेगडे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. उपहिंदकेसरी बाला शेख यांनी उपमहाराष्ट्र केसरी सचिन येलभर यांस घिस्सा डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस व चांदीची गदा पटकावली. कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल तळेगाव केसरी अशोक जाधव आणि धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्तोबा सातकर यांचा गावकीच्या वतीने आमदार बाळा भेगडे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आखाड्यात एकूण ५० लहान - मोठ्या निकाली कुस्त्या झाल्या. एकूण सुमारे सात लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून आमदार बाळा भेगडे, बाळासाहेब सातकर, बाळतात्या भेगडे, नारायण भेगडे, अशोक जाधव, बाळासाहेब सरोदे, राजेंद्र मिरगे, शंकर कंधारे, संभाजी भेगडे आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन बाबा लिम्हण यांनी केले. सूत्रसंचालन समितीचे माजी अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले.
गुढीपाडव्याच्या दिवशी समिती अध्यक्ष अनिकेत भेगडे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींना अभिषेक करण्यात आला. शाही पद्धतीने पालखीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मालती इनामदार यांच्या लोकनाट्य तमाशाने गर्दी खेचली होती. डोळसनाथ मंदिर पटांगणात भजनी भारुडाचा कार्यक्रम झाला. जिजामाता चौकात झालेल्या म्युझिक मेकर्स आॅर्केस्ट्रासही प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी डोळसनाथ मंदिर प्रांगणात झालेल्या ‘मदमस्त अप्सरा’ या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. उत्सव समितीतील योगदानाबद्दल माजी अध्यक्ष अरुण भगवान भेगडे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
समिती अध्यक्ष अनिकेत भेगडे, सरचिटणीस सुशील गाडे, सुमित लांजेकर, खजिनदार शैलेश बेल्हेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Bala Sheikh beat Sachin over Yel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.