किल्ले बनविण्यात बालगोपाल दंग
By admin | Published: November 11, 2015 01:21 AM2015-11-11T01:21:28+5:302015-11-11T01:21:28+5:30
श्री योद्धा प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत या वर्षी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे
लोणावळा : श्री योद्धा प्रतिष्ठान मित्र मंडळ आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत या वर्षी लोणावळा शहर व ग्रामीण भागातील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी हे बालचमू दिवसभर किल्ले बनविण्यात दंग असल्याचे दिसत होते. स्पर्धेतील सहभागी युवकांचा उत्साहही वाखण्याजोगा होता.
दिवाळी सणानिमित्त घरोघरी किल्ले तयार केले जातात. मात्र, मागील काही काळापासून मुलांचा किल्ले बनविण्याचा उत्साह कमी होऊ लागला होता. मुलांचा हा उत्साह कायम राहावा व त्यांना गड-किल्ले व इतिहासाची सतत जाणीव राहावी, त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, याकरिता मागील सहा वर्षांपासून योद्धा प्रतिष्ठान किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करत आहे. या वर्षी स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच ६० संघांनी नावनोंदणी करत स्पर्धेत सहभाग नोंदवला. आजही काही नवीन संघ यामध्ये नव्याने दाखल झाले. सकाळी ८ वाजल्यापासून बालगोपाल किल्ले बनविण्यात दंग होते. तहान-भूक हरपून ते किल्ले बनविण्यात तल्लीन झाले होते. प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धकांना किल्ले बनविण्यासाठी माती, दगड, पाणी आदी साहित्य पुरविण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. किल्ला पूर्ण करणाऱ्या प्रत्येक संघाला रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या वर्षी प्रथमच स्पर्धकांसाठी प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दर दिवशी स्पर्धकांना इतिहासावर आधारित ५० प्रश्न विचारण्यात येत आहेत. बरोबर उत्तर देणाऱ्यांना मंडळाच्या वतीने बक्षिसे दिली जात आहेत. तीन दिवसांत हे किल्ले पूर्ण करायचे असून, दि. १४पासून या किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे संस्थापक-अध्यक्ष रूपेश नांदवटे यांनी सांगितले. (वार्ताहर)