खात्यात शिल्लक २३९ रुपये, तरी फसवणूक झाली २ लाखांची; सावधान, तुम्हीही होऊ शकता शिकार
By विवेक भुसे | Published: August 7, 2023 12:24 PM2023-08-07T12:24:54+5:302023-08-07T12:25:16+5:30
गुगलवर सायबर चोरट्यांनी अनेक बनावट नंबर टाकलेले आहेत...
पुणे : एका महिलेला आपली ऑनलाइन फसवणूक होतेय, हे समजल्यावर तिने तातडीने खात्यातील सर्व रक्कम दुसऱ्या बँक खात्यात वळती केली. खात्यात केवळ २३९ रुपये शिल्लक ठेवले. बँकेला एटीएम ब्लॉक करायला सांगून ते कार्ड ब्लॉक केले. काही दिवसांनी नवीन एटीएम कार्ड घेतले. त्यावेळी तिच्या खात्यात २३९ रुपये शिल्लक असतानाही तिची तब्बल १ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समजले. आश्चर्य वाटले ना. पण हा प्रकार हिंजेवडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेच्या बाबतीत घडला आहे. असाच प्रकार कोणाच्याही बाबतीत घडू शकतो. त्यामुळे सावधान राहण्याची गरज आहे.
याबाबत एका २६ वर्षाच्या महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला आपल्या कॉम्प्युटरवर टेली सॉफ्टवेअरवर काम करते. १२ एप्रिल रोजी तिचे सॉफ्टवेअर व्यवस्थित चालत नसल्याने तिने गुगलवरून टॅली कॉल सेंटरचा मोबाइल नंबर शोधला. त्यावर कॉल केला. समोरून बोलणाऱ्याने सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी १० रुपये ऑनलाइन भरावे लागतील, असे सांगितले. त्यावेळी तिच्या मोबाइलवर आलेला ओटीपी तिने समोरच्या व्यक्तीला सांगितला. त्याबरोबर तिच्या खात्यातून ५ हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. तिने पुन्हा त्या क्रमांकावर फोन केल्यावर तो उचलला गेला नाही. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने तातडीने आपल्या त्या खात्यावरील सर्व रक्कम इतर बँक खात्यावर वळती केली. तिने खात्यात २३९ रुपये शिल्लक ठेवले. त्यानंतर बँकेत जाऊन तिने फसवणूक झाल्याचे सांगून एटीएम ब्लॉक करण्यास सांगितले. त्यानुसार बँकेने एटीएम ब्लॉक केले.
नवीन एटीएम मिळविण्यासाठी तिने अर्ज केला. एक आठवड्याने २० एप्रिल रोजी तिला नवीन एटीएम मिळाले. एटीएम अपडेट होत नसल्याने त्या बँकेत गेल्या. बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याला लिंक असलेला मोबाइल नंबर पाहिला. तो वेगळा होता. बँकेने नंबर बदलण्यासाठी फॉर्म दिला. तो भरल्यावर २४ तासात नवीन मोबाइल नंबर बदलला जाईल, असे सांगितले. त्यानुसार २१ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा मोबाइल नंबर बदलला गेला. त्यांनी २५ हजार रुपये आणि ५० हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यांनी खात्यातील शिल्लक रक्कम तपासली. तेव्हा खात्यात १ लाख १५ हजार रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. आपल्या खात्यात फक्त २३९ रुपये शिल्लक असताना इतकी रक्कम शिल्लक कशी? याची चौकशी केली. तेव्हा २० एप्रिल रोजी त्यांचे नवीन एटीएम सुरू झाले. त्यावर रात्री सव्वा सात वाजता ३ लाख ५ हजार रुपये वैयक्तिक कर्ज १४ टक्के दराने ऑनलाइन देण्यात आले होते. त्यानंतर पाठोपाठ ७ वेळा एकूण १ लाख ९० हजार ११ रुपये काढण्यात आले होते. त्यांनी पुन्हा एटीएम ब्लॉक केले. सायबर पोलिसांकडे तातडीने तक्रार केली. यानंतर बँकेकडून त्यांना कर्ज भरण्याच्या नोटिसा येऊ लागल्या. त्यानंतर आता तब्बल सव्वा वर्षाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विजय खोमणे तपास करीत आहेत.
* गुगलवर सायबर चोरट्यांनी अनेक बनावट नंबर टाकलेले आहेत. त्यावर सर्च करून नंबर घेऊ नका
* कोणतेही कस्टमर केअरचा नंबर, संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊनच खात्री करा
* कोणालाही ओटीपी सांगू नका, असे वारंवार सांगितले तरीही आयटी कंपनीत काम करणाऱ्या या महिलेने अगदी सहजपणे ओटीपी दिला.
* १० रुपये किंवा अतिशय किरकोळ रक्कम पाठविण्यास सांगितले जात असेल तर सावध राहा. ती फसवणुकीची सुरुवात असू शकते.
* फसवणूक झाल्यावर तुम्ही एटीएम ब्लॉक केल्यानंतर नवीन एटीएम घेतल्यावर अगाेदर त्याचा बँक खात्याला लिंक केलेला नंबर तुमचाच आहे ना, याची अगोदर खात्री करा.