संतुलित आहार घेतल्यास, कोरोना होईल हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:33+5:302021-05-12T04:11:33+5:30
आहारतज्ज्ञांचा सल्ला : भरपूर पाणी प्यावे, ४० दिवस ते ४ महिने आहाराचे गणित पाळावे प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क ...
आहारतज्ज्ञांचा सल्ला : भरपूर पाणी प्यावे, ४० दिवस ते ४ महिने आहाराचे गणित पाळावे
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या दैनंदिन वेळापत्रकात औषधोपचार, विश्रांती याप्रमाणेच आहारालाही अनन्यसाधारण महत्व असते. रुग्णांचा आहार कसा असावा, याबाबतचा डाएट प्लॅन केंद्र सरकारनेही नुकताच जाहीर केला आहे. याबाबत आहारतज्ज्ञांशी संवाद साधला असता, ''संतुलित आहार, कोरोना हद्दपार'' हाच कानमंत्र त्यांनी दिला.
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आहारात प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, सॅलड यांचा समावेश असावा, भरपूर पाणी प्यावे तसेच हवाबंद, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत ही त्रिसूत्री आहारतज्ज्ञांकडून सुचविण्यात आली आहे. संसर्गाच्या काळात शरीराची झीज झालेली असते, तसेच प्रतिकारशक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे पुढील ४० दिवस ते ४ महिने आहाराचा समतोल राखणे फायद्याचे ठरते.
-----
* आहारात लोहाचे, झिंकचे प्रमाण जास्त असावे लागते. पालेभाज्यांमधून लोह, शेवग्याच्या शेंगा, डिंक यातून झिंक मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
* जवस, तीळ, कारळ्याची चटणी यांचाही आहारात समावेश असावा. पचायला जड असणारे पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
* मुगाचे डोसे, मिक्स डाळीचे डोसे, नाचणी, ज्वारी, बाजरी एकत्रित करून तयार केलेली भाकरी यांचा आहारात उपयोग होतो. घसा दुखत असेल आणि दही-ताक घेणे शक्य नसेल तर कणिक मळताना त्यामध्ये एक दोन चमचे दही समाविष्ट करता येते.
* राजगिरा अथवा शिंगाड्याच्या पीठ, हळिवाचे लाडू किंवा खीर हेही पदार्थ पौष्टिक ठरतात.
* दररोज सकाळी लसणाची एक पाकळी खाल्ल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते.
* जास्तीत जास्त पाणी, जिरेपूड आणि मीठ घातलेले ताक, नारळ पाणी यामुळे डीहायड्रेशन टाळता येते. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांसाठी लसणाच्या पाकळ्या, डिंकाचे किंवा मेथीचे लाडू, जवसाची चटणी, शहाळ्याचे पाणी असे पदार्थ नातेवाइकांकडून पोहोचवता येऊ शकतात.
- ज्ञानदा चितळे, आहारतज्ज्ञ
-----------
* डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंटची पातळी जास्त असते. चॉकलेट ७० टक्क्यांहुन अधिक डार्क आणि कमी साखरेचे असावे. चॉकलेट गोड असेल तर त्यामुळे साखर जास्त असते.
* कोरोना काळातील औषधे तीव्र स्वरूपाची असतात. त्याचे काही दुष्परिणामही होतात. औषधांमुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. हे विषारी पदार्थ यकृताच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकले जात असल्याने त्यासाठी कोबी, फ्लॉवर, मुळा, शेपू, यांसारख्या उग्र वासाच्या भाज्या सेवन कराव्यात. कच्च्या भाज्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते.
* विषाणूशी लढा देण्यात विटामिन ''ए'' चा उपयोग होतो. लाल भोपळा, गाजर, दूध या माध्यमातून शरीराला विटामिन मिळते .
* अँटीबॉडी प्रोटीनपासून तयार झालेल्या असतात. त्यामुळे आहारात प्रथिनांचे सेवनही पुरेसे असले पाहिजे. डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर यातून प्रथिनांची गरज पूर्ण होते.
- विभूषा जांभेकर, आहारतज्ज्ञ
---------
* कोरोना विषाणूंचा संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी तीव्र स्वरूपाची औषधे दिली जातात. अँटिबायोटिक्समुळे शरीरातील चांगले जीवजंतू कमी होतात. शरीरातील पोषक घटकांचे प्रमाण कायम राखण्यासाठी प्रथिनांचा उपयोग होतो.
* कोरोना काळात किंवा होऊन गेल्यानंतरही बऱ्याच जणांना खोकला कायम राहतो. अशा वेळी हळद आणि मिरी पावडरचा चहा आरोग्यदायी ठरतो. उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने किंवा काढा घेतल्याने उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे प्रमाण अत्यंत मर्यादित असावे. वास आणि चव गेल्यामुळे या काळात अन्न जात नाही. आल्याचा छोटा तुकडा मीठ आणि लिंबू लावून चाटल्याने भूक वाढण्यास मदत होते.
* औषधांचे बरेच दुष्परिणाम होतात आणि पोटात आग होणे, दाह निर्माण होणे असा त्रास होतो. धने-जिऱ्याचे पाणी, साळयाच्या लाह्यांचे पाणी थंडावा देण्यास मदत करते.
* एरवी शरीराला वजनाच्या प्रति किलोग्राम ०.८ ग्रॅम एवढ्या प्रथिनांची गरज असते. कोरोनाच्या काळाची गरज ही गरज १ ते १.५ ग्रॅम प्रति एक किलोग्रॅम एवढी वाढलेली असते. त्या दृष्टीने आहाराचे नियोजन करावे.
- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ