पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिलाच मेळावा; ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:41 AM2022-12-01T09:41:54+5:302022-12-01T09:42:01+5:30
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारमधील काही मंत्रीही या मेळाव्याला उपस्थित राहणार
पुणे: बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा शहरातील पहिलाच मेळावा ४ डिसेंबरला होत आहे. या गटाने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली असून, या मेळाव्यात काही जणांचे राजकीय प्रवेश होणार असल्याचे समजते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारमधील काही मंत्रीही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेतून फुटून निघालेल्या या गटाला सुरुवातीला पुण्यातून प्रतिसाद मिळाला नाही. युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी, हडपसरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी प्रवेश केल्यानंतर शहरात या गटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माजी शहरप्रमुख अजय भोसले यांनीही या गटात प्रवेश केला. भानगिरे यांनी सारसबागेजवळ पक्षाचे कार्यालयही तयार केले. पूर्ण तयारीने महापालिकेची निवडणूक लढवण्याचा या गटाचा प्रयत्न आहे.
युवा सेना, महिला सेना अशा सर्व आघाड्यांचा हा संयुक्त मेळावा असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित केले आहे. मात्र, अद्याप त्यांचा दौरा निश्चित झालेला नाही. खासदार डॉ. शिंदे मात्र मेळाव्याला येणार आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाला शह देण्याचा बाळासाहेबांची शिवसेना गटाचा प्रयत्न आहे. मात्र, अद्याप त्यांच्या हाती काही लागलेले नाही. त्यामुळे मेळावा आयोजित करून जाहीरपणे शक्तिप्रदर्शन करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शिवसेनेतील काही नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक संपर्कात असल्याचे शिंदे गटाकडून बोलले जाते. त्यांच्यापैकी काहींचा प्रवेश मेळाव्यात करून घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.