शरद पवार देशाचे नेते, त्यांना जपणे केंद्र सरकारचे काम : बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:40 PM2020-01-24T18:40:05+5:302020-01-24T19:01:09+5:30
पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी देण्यात येणारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. पवार यांना त्याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. सुरक्षा कमी केल्याच्या कारणास्तव आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी नाराजी केली असताना त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भर पडली आहे.
पुणे : केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यावर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पवार हे देशपातळीवरील नेते असून त्यांची सुरक्षा काढणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
थोरात पुण्यात ऍड. रावसाहेब शिंदे पुरस्कार वितरण समारंभासाठी आले होते. कार्यक्रमाच्या पूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ रघुनाथ माशेलकर, आमदार प्रशांत गडाख यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, 'पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी देण्यात येणारी सुरक्षा कमी करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे पवार यांना त्याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. आगामी दिल्ली निवडणुकीच्या व्यवस्थेत आवश्यक यंत्रणेच्या कारणास्तव सुरक्षा कमी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र सुरक्षा कमी केल्याच्या कारणास्तव आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांनी नाराजी केली असताना त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भर पडली आहे.
थोरात या मुद्दयावर बोलताना म्हणाले की, ' पवार हे देशपातळीवरील नेते आहेत. देशपातळीवर प्रमुख नेत्यांत त्यांचे नाव असून त्यांना जपणे हे सरकारचे काम आहे.अशाप्रकारे त्याची सुरक्षा काढणं चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- राज ठाकरे यांनी लोकसभेला त्याची भाषण चांगली केली होती,मुद्दे चांगले मांडले.
- त्यांनी लोकशाहीशी निगडित राहावं,घटनेशी निगडित राहावं,राजकारण तर होत जातं.
- एकंदरीत भाजपच केंद्रीय पातळीवरील काम पाहिले तर भाजप लोकशाही ठेवणार का नाही हे वाटून जाते. आपल्या मूलभूत तत्वांना धोका पोचवण्याचे काम सुरु आहे.