बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, भीमसेन जोशी कला मंदिर दुरुस्तीसाठी बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:33 AM2024-01-25T11:33:03+5:302024-01-25T11:34:30+5:30
बालगंधर्व रंगमंदिर १६ फेब्रुवारी ते १६ मार्च आणि गणेश कला क्रीडा मंदिर, भीमसेन जोशी कला मंदिर २ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी बंद राहणार
पुणे : पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात देखभाल दुरुस्तीचे काम येत्या १६ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत केले जाणार आहे. या कालावधीत प्रामुख्याने उन्हाळ्यापूर्वी वातानुकूलित यंत्रणा तसेच अंतर्गत दुरुस्तीची कामे, दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या सांस्कृतिक विभागाने महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवला आहे.
पुणे शहरात महापालिकेची १४ सांस्कृतिक केंद्रे आहेत. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक तसेच संस्था, राजकीय पक्षांना वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ही नाट्यगृहे भाडेकराराने दिली जातात. त्यात, बालगंधर्व रंगमंदिर हे सर्वाधिक मागणी असलेले नाट्यगृह आहे. येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असल्याने तसेच नाट्यगृह जुने झाल्याने त्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याला विरोध झाल्याने तसेच पुनर्वसनाचा निर्णय होत नसल्याने येथे अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यात प्रामुख्याने वातानुकूलित यंत्रणेचा समावेश आहे. तसेच स्वच्छतागृह, खुर्च्या, स्टेज तसेच विद्युत विभागाशी संबंधित कामेही महिनाभरात केली जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरूरे यांनी दिली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या जानेवारी ते एप्रिल या महिन्यांतील तारखांसाठी सप्टेंबरमध्ये बुकिंग घेतले जाते. त्यानुसार, महापालिकेने वर्धापन दिन तसेच इतर कार्यक्रमांना तारखाही दिल्या होत्या. मात्र, नाट्यगृहाचे काम करण्याचे निश्चित झाल्याने या सर्व तारखा रद्द केल्या जाणार आहेत. पालिकेच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रमही इतर नाट्यगृहात घेतले जाणार आहेत.
गणेश कला क्रीडा मंदिरही राहणार बंद
शहरातील गणेश कला क्रीडा मंदिर आणि औंध येथील भीमसेन जोशी कला मंदिर दुरुस्तीसाठी २ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान बंद राहणार आहे. या कालावधीत येथे दुरूस्तीची कामे वेगाने केली जाणार आहेत.