Bal gandharva Rangmandir: बालगंधर्व रंगमंदिरालाही पावसाचा फटका; सुशोभीकरणावर लाखो खर्च, दुरूस्ती मात्र ‘जैसे थे’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:24 AM2024-06-11T10:24:13+5:302024-06-11T10:25:05+5:30
लाखो खर्च करून बालगंधर्व रंगमंदिर सजविण्यात आले, परंतु पहिल्याच पावसात छत गळू लागले
पुणे : शहरात शनिवारी (दि. ८) झालेल्या पावसाचा फटका बालगंधर्व रंगमंदिरालाही (Bal gandharva Rangmandir) बसला आहे. या रंगमंदिराच्या छतातून पाणी आल्याने कार्यक्रमात अडथळा झाला. याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली सुशोभीकरणावर लाखो रुपये खर्च केले; पण दुरुस्तीवर काहीच केले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बालगंधर्व रंगमंदिराच्या व्यवस्थापकांनी सांगितले की, छत गळके नसून, एका पाइपमध्ये गाळ, कचरा साठल्याने तिकडचे पाणी छताकडे आले आणि हा प्रकार झाला आहे.
लाखो रुपये खर्च करून बालगंधर्व रंगमंदिर सजविण्यात आले. परंतु, पहिल्याच पावसात छत गळू लागले आणि बकेट ठेवावी लागली. कार्यक्रम सुरू असताना हा प्रकार घडल्याने अनेक रसिकांनी नाराजी व्यक्त केली. या गळतीमुळे प्रेक्षागृहातील कार्पेट खराब झाले आणि भिंतही ओली झाली.
बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम सुरू असताना छतामधून पाणी येत होते. हे अतिशय निंदनीय आहे. बालगंधर्वच्या पुनर्विकासावर लाखो रुपये खर्च करण्यात आले, पण खरंतर दुरुस्ती झालेलीच दिसत नाही. रंगमंदिरातील पडदे जुनेच वापरले आहेत. त्यामुळे योग्य कामे झाले नसल्याचे समोर येत आहे. - राजाभाऊ तिखे, कराओके असोसिएशन
छताजवळील एका पाण्याच्या पाइपमध्ये कचरा, गाळ साठला होता. त्यामुळे तिथले पाणी छताकडे आले. यानंतर आम्ही इंजिनिअरला बोलावून पाहणी केली. तेव्हा पाइपमध्ये कचरा, गाळ दिसला. त्यामुळे हा प्रकार झाला. - राजेश कामठे, प्रशासकीय अधिकारी, बालगंधर्व रंगमंदिर