बालगंधर्वचे कलात्मक सौैंदर्य जपले जावे : मान्यवरांचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 09:52 PM2018-06-26T21:52:57+5:302018-06-26T21:57:43+5:30
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तुला धक्का न लावता पुनर्विकास झाला पाहिजे....
पुणे : नाट्यगृहे आणि क्रीडांगणे शहराची फुप्फुसे असतात. ती जगण्याचा आधार देतात. महानगरपालिकेने विकासाच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिराचा श्वास कोंडण्याचा प्रयत्न करु नये. व्यावसायिक संकुलाच्या गदारोळात ऐतिहासिक वास्तूचे महत्व लोप पावेल. त्यामुळे विकास करताना बालगंधर्वचे कलात्मक सौैंदर्य जपले जावे, अशा शब्दांत मान्यवरांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत नाराजी व्यक्त केली.
बालगंधर्व परिवारतर्फे बालगंधर्व रंगमंदिर : पुनर्विकास की पूर्णविराम या विषयावरील चर्चासत्रात खासदार वंदना चव्हाण, डॉ. सतीश देसाई, मुरलीधर मोहोळ, रंगकर्मी अनंत कान्हो, सुनील महाजन, मोहन कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार मुकूंद संगोराम यांच्याशी समीरण वाळवेकर यांनी संवाद साधला. परिवारचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि राज काझी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तुला धक्का न लावता पुनर्विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा विविध मान्यवरांनी व्यक्त केली. पुनर्विकासाचा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर असून सर्वांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची ग्वाही स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली
वास्तूचा पुनर्विकास ही काळाची गरज असल्याचे मत नाना पाटेकर आणि दीपा लागू यांनी व्यक्त केले आहे. सत्तेच्या बळावर या वास्तूचा इतिहास पुसण्याचा किंवा नाव बदलण्याचा प्रयत्न होणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प साकारला जाईल, असे मोहोळ यांनी सांगितले. नव्या प्रकल्पांमुळे सर्व कलाप्रकारांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वंदना चव्हाण म्हणाल्या, सांस्कृतिक केंद्र विकसित करण्यासाठी शहरात अनेक जागा असताना ही वास्तू पाडून नवीन बांधकाम करणे कितपत व्यवहार्य ठरेल, याचा विचार झाला पाहिजे. एकाच ठिकाणी तीन नाट्यगृहे झाली तर वाहतुकीकोंडी किती वाढेल याचा अभ्यास झालेला नाही. केंद्र करण्यासाठी पुलंनी उभारलेल्या वास्तूवरच डोळा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
देसाई म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्णमहोत्सव आणि पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांत पुणेकरांच्या भावनांवर मीठ चोळण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. महापालिकेचे सांस्कृतिक धोरण असल्याखेरीज असे प्रश्न सुटणार नाहीत. कलाकारांना नाटकाच्या तालमी आणि नाट्यवाचनासाठी जागा उपलब्ध होत नाही. दुसरीकडे महापालिका नाट्यगृहांच्या उभारणीतून पांढरे हत्ती पोसत आहे,याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.
बालगंधर्व रंगमंदिर ही वारसा वास्तू असल्याने ते पाडता येणार नाही. रंगमंदिराच्या व्यवस्थापनाबाबत महापालिका उदासीन आहे. मूळ वास्तुला धक्का न लावता पुनर्विकास केला पाहिजे, अशी मागणी कुलकर्णी आणि अनंत कान्हो यांनी केली. रंगमंदिराच्या आवारात जागा आहे म्हणून जलतरण तलाव उभारणारी महापालिका कलांबाबत किती गंभीर आहे, असा प्रश्न संगोराम यांनी उपस्थित केला.