बालगंधर्वांची हृदयातून गायकी - निर्मला गोगटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:31 AM2018-07-14T02:31:28+5:302018-07-14T02:31:37+5:30
बंदिश हे रागांवरील भाष्य आहे, तर बालगंधर्वांचे नाट्यगीत हे नाट्य या संकल्पनेवरचे भाष्य होते. शास्त्रीय संगीतात नाभीपासून आणि मोकळा श्वास घेऊन गाणे अपेक्षित असते, बालगंधर्वांनी त्याही पुढची पातळी गाठून हृदयातून आपली गायकी सादर केली.
पुणे : बंदिश हे रागांवरील भाष्य आहे, तर बालगंधर्वांचे नाट्यगीत हे नाट्य या संकल्पनेवरचे भाष्य होते. शास्त्रीय संगीतात नाभीपासून आणि मोकळा श्वास घेऊन गाणे अपेक्षित असते, बालगंधर्वांनी त्याही पुढची पातळी गाठून हृदयातून आपली गायकी सादर केली. आपल्या भूमिकेशी समरस होऊन सहजसुंदर अभिनय करणे हे बालगंधर्वांचे वैशिष्टय होते, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांनी बालगंधर्वांची गायकी उलगडली.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे सांगली येथील प्रसिद्ध गायिका मंगला जोशी यांना यंदाच्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष स. गो. तथा नाना कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बालगंधर्वांच्या ५१व्या स्मृतिदिन समारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रुपये २५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मुंबईचे संगीत नाट्यलेखक प्रदीप ओक यांना अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार (रोख रुपये १५ हजार आणि स्मृतिचिन्ह), मुंबईचे प्रसिद्ध गायक पंडित अरविंद पिळगावकर यांना भास्करबुवा बखले पुरस्कार (रोख रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) आणि रत्नागिरीचे तबलावादक हेरंब जोगळेकर यांना डॉ. सावळो केणी पुरस्कार (रोख रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) देऊन सन्मानित करण्यात आले.
निर्मला गोगटे म्हणाल्या, की आपल्या कलेवर नितांत प्रेम आणि श्रद्धा ठेवून बालगंधर्वांनी हृदयापासून कलेची उपासना केली. विविध कला या सौंदर्यदृष्टी निर्माण करणाऱ्या असतात, तर बालंगधर्वांची गायकी सौंदर्यवृत्ती निर्माण करणारी होती.
उल्हास पवार म्हणाले, की बालगंधर्वांचे नाव उच्चारताच महाराष्ट्रीतील नाट्यसंगीत क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण व्हायचे. श्रोत्यांना नेहमीच देव संबोधणारे बालगंधर्व हेच खरे तर अवघ्या महाराष्ट्राचे दैवत होते.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी प्रास्ताविक केले. नारायण भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे कार्याध्यक्ष स. गो. तथा नाना कुलकर्णी यांनी आभार मानले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नाट्यसंगीताची मैफल रंगली. अरविंद पिळगावकर, बकुल पंडित, सुरेश साखवळकर, मंगला जोशी, रवींद्र कुलकर्णी, सुचेता अवचट, संपदा माने या गायक कलाकारांनी सहभाग घेतला. त्यांना धनवर्षा प्रभुणे (आॅर्गन), हेरंब जोगळेकर (तबला) आणि प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) या वादक कलाकारांनी सुरेल साथसंगत केली.
या वेळी गोविंद बल्लाळ देवल पुरस्काराने सांगलीचे शशांक लिमये यांना, काकासाहेब खाडिलकर पुरस्काराने पुण्याच्या प्रसिद्ध गायिका सुचेता अवचट यांना, तर खाऊवाले पाटणकर पुरस्काराने आकुर्डीच्या महिला आॅर्गनवादक धनवर्षा प्रभुणे यांना आणि रंगसेवा पुरस्काराने डोंबिवलीचे सुभाष बिरजे व पुण्याचे प्रमोद भालेराव यांना गौरविण्यात आले. प्रत्येकी रोख रुपये ५ हजार आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
मुंबईच्या उदयोन्मुख गायिका, अभिनेत्री संपदा माने-कदम यांना ताई पंडित पुरस्काराने, अशोक आंबेकर आणि कल्पना कुलकर्णी यांना द. कृ. लेले पुरस्काराने, बालकलाकार नित्या आनंद बायस यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले.
या वर्षीच्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाºया मुंबई महापालिका शिक्षण विभाग-संगीत कला अकादमीचा ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाबद्दल गौरव करण्यात आला.