खेड तालुक्यातील बळीराजा आनंदात; कळमोडी धरण १०० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 03:29 PM2024-07-21T15:29:24+5:302024-07-21T15:29:41+5:30

सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत होते, परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पाहायला मिळतोय

Baliraja Ananda of Khed taluka Kalamodi Dam is 100 percent full | खेड तालुक्यातील बळीराजा आनंदात; कळमोडी धरण १०० टक्के भरले

खेड तालुक्यातील बळीराजा आनंदात; कळमोडी धरण १०० टक्के भरले

डेहणे (पुणे): खेड तालुक्यातील पश्चिम व पुर्व पट्ट्याला वरदान ठरलेले कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. कळमोडी धरणातील सांडव्यावरून पुर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग आरळा नदी पात्रात होत असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सर्वप्रथम शंभर टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
 
कळमोडी धरण रविवारी (दि. २१) पहाटे पुर्ण क्षमतेने भरल्यावर पहाटे साडेपाचच्या दरम्यान धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. धरणाची २.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा क्षमता आहे. कळमोडी धरण भरल्यानंतर चासकमान धरणाच्या जलसाठा वाढण्यास मदत होते .१ जुनपासून ४६६ मी.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी १७ जुलैला भरलेल्या धरणाला चालुवर्षी २१ जुलै हा दिवस उजाडला आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत असल्याने चासकमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.
    
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या भागासाठी आरक्षित पाणी चासकमान प्रकल्पाचा घळभरणीसाठी वापरण्यात येते, परंतु प्रकल्पासाठी कालवा नसल्याने आरळा नदीच्या पात्रातून पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, देवोशी व अंतर्गत कुडे, बांगरवाडी, येनिये या गावातला सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. पश्चिम भागातील अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना ह्या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने सुटला आहे.

प्रत्यक्षात धरणाची साठवण क्षमता जरी १.५१ टीएमसी आली तरी अंतर्गत राडारोडा असल्याने  पाणी साठवण पूर्ण क्षमतेने  होत नाही. आतमध्ये असणारा राडारोडा काढण्याची मागणी  गेली अनेक वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गात केली जात आहे. सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत होते. परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने नदी खालील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रातील शेतीविषयक औजारे वा तत्सम साहित्य अथवा जनावरे यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Baliraja Ananda of Khed taluka Kalamodi Dam is 100 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.