बंदी असूनही बैलगाडा शर्यत
By admin | Published: April 13, 2016 03:36 AM2016-04-13T03:36:37+5:302016-04-13T03:36:37+5:30
बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे रविवारी भिर्र्रर्र झाली. भैरवनाथ यात्रा-उत्सवानिमित्त येथे २५ नामवंत बैलगाडे धावले. विशेष म्हणजे
पुणे : बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे रविवारी भिर्र्रर्र झाली. भैरवनाथ यात्रा-उत्सवानिमित्त येथे २५ नामवंत बैलगाडे धावले. विशेष म्हणजे, लांडेवाडी हे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे गाव आहे.
लांडेवाडी यात्रा-उत्सव कमिटीच्या वतीने या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे.
खासदारांच्याच गावात बैलगाडा शर्यती सुरू असल्याची बातमी सगळीकडे पसरली. शर्यतीबाबत आयोजकांना फोन येऊ लागल्याने शर्यती आटोपत्या घ्याव्या लागल्या. शर्यती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
सकाळी ११ वाजता शर्यतींना सुरुवात झाली. मात्र, १२.३०च्या सुमारास या शर्यती बंद झाल्या. या वेळी सुमारे २५ गाडे धावले. पारनेर, नगर, खेड, शिरूर या ठिकाणांहून बैलगाडे आले होते. मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की शर्यतीबद्दल कळल्यानंतर पोलीस पथक लांडेवाडीत गेले. सुरू असलेल्या शर्यती बंद केल्या. पुन्हा शर्यती सुरू होऊ नयेत म्हणून आम्ही दिवसभर लांडेवाडीतच होतो.
बंदी-स्थगिती-बंदीचा खेळ
२००६मध्ये औरंगाबाद खंडपीठाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. १५ फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या बंदीला तात्पुरती स्थगिती देत त्या सुरू केल्या. ७ मे २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्राणी क्रूरता कायद्यानुसार पुन्हा शर्यतींवर कायमची बंदी घातली. पदरमोड करून अनेक बैलगाडा मालकांनी दिल्ली वाऱ्या केल्या. पंजाब, तमिळनाडूमध्ये जाऊन त्यांनी बैलगाडामालकांचे संघटन केले. बैलगाडा मालकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश येऊन ७ जानेवारी २०१६ रोजी वन व पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जारी केली व पुन्हा शर्यती सुरू झाल्या. मात्र, उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी घातली होती.
ही बंदी झुगारून लांडेवाडीत बैलगाडा
शर्यती झाल्या. या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यभरातून सुमारे १६० नामवंत गाडे या ठिकाणी आले होते.
मला काहीही माहिती नाही : खासदार आढळराव-पाटील
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी गावात नव्हतो. बैलगाडा शर्यतीविषयी मला काहीही माहिती नाही,’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.