बालवाडी शिक्षिकांना ८ ते १० हजार रुपये मानधन वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:08 PM2018-09-18T16:08:31+5:302018-09-18T16:20:20+5:30
मराठी, उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमांच्या ५१५ बालवाडी शिक्षिका आणि ४२३ बालवाडी सेविकांना मानधन वाढीचा लाभ होणार आहे.
पुणे: महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिका व सेविका यांना सरसकट वेतनवाढ न देता त्यांची सेवा विचारात घेऊन पंधरा वर्षांपेक्षा कमी सेवा झालेले कर्मचारी व पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले कर्मचारी अशी वर्गवारी करण्यात करून पंधरा वर्षांहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना दहा हजार रुपये व सेविकांना साडेसात हजार रुपये मानधन देण्याचे ठरविण्यात आले. तसेच पंधरा वर्षांहून अधिक सेवा झालेल्या शिक्षिकांना अकरा हजार पाचशे रुपये व सेविकांना साडेआठ हजार मानधन देण्यास मान्यता देण्यात आली. दर दोन वर्षांनी १० टक्के दरवाढ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले, अशी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा हा उद्देश ठेवून या बालवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतू तेथे शिक्षण देणारे शिक्षक आणि सेविकांना अत्यल्प मानधन दिले जात असल्याने सर्वसाधारण सभेमध्ये सर्वच पक्षीय सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत शिक्षिकांचे वेतन वाढविण्यासोबतच धोरण ठरवावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने खास धोरण करून स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवले होते. याबाबत मुळीक यांनी सांगितले की, सेवकांची वीस वर्षांहून कमी सेवा झालेले कर्मचारी व वीस वर्षांहून अधिक सेवा झालेले कर्मचारी असे गट प्रशासनाने केले होते. स्थायी समितीने उपसुचनेद्वारे ही मर्यादा पंधरा वर्षे केली. उपसुचनेद्वारे प्रशासनाने निश्चित केलेल्या मानधनात पाचशे रुपयांची वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. नगरसेवक सुनील कांबळे, दिलीप वेडे-पाटील, आबा तुपे, दिलीप बराटे यांनी ही उपसुचना दिली होती.
या कर्मचा-यांना दहा नैमित्तिक रजा मिळणार आहेत, १८० दिवस प्रसुती रजा, शहरी गरीब योजनेच्या सभासदत्वासाठी उत्पन्नाची अट शिथिल, गाडीखान्यातून विनामूल्य औषधे, मनपा रुग्णालयात बिाह्य व आंतररुग्ण विभागातून विनामूल्य उपचार व औषधे आदी सुविधा मिळणार आहेत.
मराठी, उर्दू, इंगह्यजी व कन्नड माध्यमांच्या ५१५ बालवाडी शिक्षिका आणि ४२३ बालवाडी सेविकांना मानधन वाढीचा लाभ होणार आहे. पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाडी शिक्षिका व सेविका यांच्या मानधन, रजा व वैद्यकीय सुविधा मिळण्याबाबत महापालिका कामगार युनियनने महापौर मुक्ता टिळक यांना १७ जुलै रोजी निवेदन दिले होते.