बांबू लागवडीमुळे मिळतोय शेतकऱ्यांना आर्थिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:26+5:302021-09-18T04:11:26+5:30
जागतिक बांबू दिन पुणे : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगला पर्याय आहे. अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला तरी ...
जागतिक बांबू दिन
पुणे : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगला पर्याय आहे. अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला तरी बांबू मरत नाही. त्याला फुटवे येतातच. बांबू तोडणीची वेळ वगळता बांबू लागवडीला किंवा शेतीला मजुरांची फारशी गरज भासत नाही. पाच एकर शेत एकटा माणूस सांभाळू शकतो. बांबूची कापणी केल्यानंतर योग्य भावात बांबू विकून चांगले उत्पन्न हाती मिळू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी आता बांबू लागवडीचा विचार करू लागले आहेत.
पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, मावळ, मुळशी भागात बांबूची शेती अनेक शेतकरी करीत आहेत; परंतु मराठवाड्यातही आता त्याचा वापर होत आहे. त्यासाठी ‘वनराई’ संस्थेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून बांबू लागवडीसाठी मदत केली जात आहे, तसेच बांबू लागवडीचे महत्त्व विशद केल्याने त्याची लागवड बाजारवाहेगाव, ता. बदनापूर, जि. जालना येथे करण्यात आली आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळावे म्हणून उपक्रम सुरू केला आहे. ओढ्यालगतची माती पावसाच्या पाण्यासोबत पुन्हा ओढ्यात वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी बांबूचा वापर होत आहे. फळ-पिकाला मोसंबीला आधार म्हणून बांबूच्या काठ्यांचा वापर होतो. जंगलातील बांबू तोडला जात आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांनी लागवड केल्यास जंगल वाचतील. गावातील पडीक व उपलब्ध जमिनीवर बांबू लागवड झाली तर निसर्गाचे संवर्धन होऊ शकेल.
————————————-
बांबू लागवडीचे फायदे
बांबूला हिरवं सोनं म्हटले जाते. बांबूच्या कोंबाची भाजी करता येते. त्याच्या पानांपासून चहा तयार केला जातो. कपडेसुद्धा केले जात आहेत. बांबूचे अनेक उपयोग आहेत. औष्णिक वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या दगडी कोळशाला बांबू हा इंधन म्हणून पर्याय आहे. बांबूची लागवड वाढली तर वीज निर्मितीसुद्धा बऱ्यापैकी ग्रीन होऊ शकते. बांबूपासून बायो-सीएनजीसुद्धा तयार केला जातो. ओढ्याकाठच्या बांबू लागवडीमुळे मृदा संवर्धनाचे उद्दिष्ट साधले जात आहे. नंतर त्यातून आर्थिक लाभही मिळणार आहे.