बाप्पांच्या मिरवणुकांना बंदी; विसर्जन करताना गर्दी टाळा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 10:53 AM2020-09-01T10:53:13+5:302020-09-01T11:16:40+5:30
नागरिकांनी देखील बाप्पाचे विसर्जन करताना गर्दी करू नये..
पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यातच आज (दि.१) लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारच्या विसर्जन मिरवणुका काढण्यास व नदी, तलावात सार्वजनिक विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळेच नागरिकांनी देखील बाप्पाचे विसर्जन करताना गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
याबाबत देशमुख यांनी सांगितले, जिल्ह्यात गणेश विसर्जनानिमित्त कुठेही गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश सर्व पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. याशिवाय शासनाच्या आदेशानुसार श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नयेत. विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, मूर्तिदानासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहनदेखील देशमुख यांनी केले.
जिल्ह्यात गणेश विसर्जनानिमित्त कडक बंदोबस्त
जिल्ह्यात मंगळवारी सुमारे २ हजार सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन होणार असून, त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार कोणालाही विसर्जन मिरवणूक काढण्यात परवानगी देण्यात आलेली नाही.Þ विसर्जनासाठी ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, मूर्तिदान उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व गावांत, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल, विशेष पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.