नौकानयनावर बंदी
By admin | Published: February 7, 2015 11:36 PM2015-02-07T23:36:24+5:302015-02-07T23:36:24+5:30
परदेशी पक्षी निरीक्षणासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांची निराशा झाली़ पाटबंधारे विभागाने आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली़
भिगवण : पाटबंधारे विभागाने उजनी जलाशयात बोटींना परवानगी नाकारल्याने पुणे व परिसरातून परदेशी पक्षी निरीक्षणासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांची निराशा झाली़ पाटबंधारे विभागाने आज पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली़
या कारवाईमुळे पर्यटकांना निराशा होऊन परत जावे लागले़ स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे़
उजनी जलाशयाच्या परिसरात आलेल्या परदेशी पक्षी पाहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ, कुंभारगांव परिसरातील नागरिकांनी नौका विहाराच्या व्यवसायातून पर्यटनाला चालना दिली आहे.
पुणे शहरासह अन्य ठिकाणाहून पर्यटक सुट्टीच्या दिवशी डिकसळ पूल आणि कुंभारगाव येथे पक्षी निरीक्षणासाठी येतात. याद्वारे डिकसळ आणि कुंभारगाव येथील बऱ्याच तरुणांना रोजगार उपलब्ध झाला होता. या सर्व बोटी हाताने चालवायच्या आहेत़ पाटबंधारे खात्याची कारवाई जाचक असल्याचे गावातील तरुणांनी सांगितले.
आतापर्यत उजनी धरणात चाललेल्या अनधिकृत वाळू उपशावर कारवाई न करता तसेच परप्रांतीय मच्छिमार त्यांच्यावरही कोणतीही ठोस कारवाई न करता, स्थानिक लोकांना कारवाईचा बडगा दाखवला आहे. त्यांची रोजी रोटी बंद करण्याचा डाव असल्याची शक्यता बोलून दाखवली. परप्रांतीय मच्छिमार आणि नदीकाठी असणाऱ्या कारखान्याचे प्रदूषित पाणी यामुळे सध्या उजनीच्या पाण्यात मिळणारी माशांची पैदास घटली आहे. त्यामुळे मासेमारीवर उपजिविका करणाऱ्यांना दोनवेळच्या जेवणा एवढेही पैसे मिळत नाहीत.
(वार्ताहर)
४यावेळी कारवाई करण्यासाठी आलेले उजनी उपसा शाखेचे पळसदेव शाखा अधिकारी पांडुरंग शिवराम गवंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपणास वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्याने अनधिकृतपणे बोटीतून पर्यटन करण्यास मनाई केल्याचे सांगितले.
४तसेच पर्यटकांच्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार यासाठी कारवाई केल्याचे सांगितले. तसेच वाळू उपसा होत असताना त्यावर कारवाई केली जात नाही, असे निदर्शनास आणल्यावर त्यांनी सांगितले की, आमच्या हद्दीत जर अनधिकृत वाळू उपसा चालू असल्याचे निदर्शनात आले. तर त्याची माहिती तहसीलदारांना ताबडतोब दिली जाते. तसेच अधिकृतपणे परवाना काढल्यास आमची कोणतीही कारवाई होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.