मार्केट यार्डात वाढदिवस साजरा करण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 04:00 PM2018-03-28T16:00:22+5:302018-03-28T16:00:22+5:30
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड आवारात चार दिवसांपूर्वी एका आडत्याचा वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी करून साजरा करण्यात आला. परिणामी एका गाळ्यावरी कांद्याच्या गोण्यांना फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागली होती.
पुणे: गुलटेकडी येथील मार्केट यार्डात वाढदिवसानिमित्ताने फटाके फोडल्यामुळे कांद्याच्या गोण्यांना आग लागल्याची घटना घडली होती. बाजार समितीने त्याची दखल घेत बाजार आवारात वाढदिवस साजरा करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे बाजार आवारात फ्लेक्सबाजी किंवा फटाक्यांची आतषबाजी करता येणार नाही.तसेच या निर्णयाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड आवारात चार दिवसांपूर्वी एका आडत्याचा वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी करून साजरा करण्यात आला. परिणामी एका गाळ्यावरी कांद्याच्या गोण्यांना फटाक्यांच्या ठिणगीमुळे आग लागली होती. आगीची तीव्रता कमी असल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण आणता आली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्याचप्रमाणे बाजार आवारात अनेक ठिकाणी वाढदिवसाचे फ्लेक्स लावून बाजाराचे विद्रुपीकरण केले जाते. परंतु, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता बाजार समितीने मार्केट यार्ड आवारात वाढदिवस साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या रविवारी वाढदिवसानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करणा-या संबंधित आडत्याकडून बाजार समितीने १ हजार १०० रुपये दंड वसूल करून समज दिली आहे.
बाजार समितीचे सचिव बी.जे.देशमुख म्हणाले, मार्केट यार्डातील जागा ही शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी आहे.त्यामुळे ज्यांना आपले वाढदिवस साजरे करायचे असतील त्यांनी बाजाराबाहेर करावेत. बाजारात वाढदिवस साजरा करण्यास तसेच फ्लेक्सबाजी आणि फटाके फोडण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे निर्णयाचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई केली जाईल,असे परिपत्रक अडत्यांना दिले जाणार आहे.