कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पालिकेत नागरिक-ठेकेदारांना महिनाभर बंदी करा; महापौरांचे आयुक्तांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:35 PM2020-06-22T19:35:37+5:302020-06-22T19:38:31+5:30
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकाच हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता निर्माण
पुणे : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून पालिकेत दैनंदिन कामकाजाकरिता नागरिक आणि ठेकेदारांचे येणे वाढले आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता पालिकेत येण्यास नागरिक, ठेकेदार आणि कार्यकर्त्यांना महिनाभरासाठी मनाई करण्यात यावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
शहरातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा १२ हजारांच्या घरात गेला आहे. दिवसागणिक होणारी वाढ ही सरासरी ३५० ते ४०० च्या दरम्यान आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ३० जूनपर्यंत पालिकेच्या कार्यालयात येणारे नागरिक, ठेकेदार व इतर नागरिकांना प्रवेश निषिद्ध केला आहे. तसेच नगरसेवकांसोबत एकावेळी फक्त एकच नागरिक असावा आदेश देऊन त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
तसेच महानगरपालिका सेवा आणि कामकाजासंबंधी नगरसेवकांच्या सूचना, प्रस्ताव अथवा निवेदन असल्यास दुरध्वनी, ई-मेल व व्हॉटस्अपचा जास्तीत जास्त वापर करण्याचाही सूचना दिलेल्या आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील 'कोरोना' विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णसंख्येत होत असेली वाढ तसेच महापालिका कार्यालयांतील कर्तव्यावरील कर्मचारी-अधिकारी तसेच नगरसेवकदेखील कोरोनाबाधित होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिक, ठेकेदार, कार्यकर्ते यांना येण्यास मनाई करावी. कारण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पालिकेच्या कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. नगरसेवक कामानिमित्त पालिकेत येणार असतील तर त्यांच्यासोबत केवळ एकच कार्यकर्ता यावा असे आदेश देण्याची सूचना महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. महापौरांच्या या मागणीवर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.