शहरात रस्त्यावर सिलेंडर वापरण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 08:44 PM2018-07-18T20:44:09+5:302018-07-18T20:54:43+5:30
स्वयंपाकाच्या किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करून रस्त्यावरच खाद्यपदार्थांची विक्री करतात. महापालिकेकडून अशा विक्रेत्यांचे सिलेंडर जप्त करण्यास सुरूवात करण्यात आली आहे .
पुणे: स्वयंपाकाच्या किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करून रस्त्यावरच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचे सिलेंडर जप्त करण्यास महापालिकने सुरूवात केली आहे. अशा प्रकारे सिलिंडरचा वापर करणे धोकादायक असल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ७०० सिलेंडर जप्त करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारचेच तसे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. सिलेंडरचा असा वापर केल्यास ५ हजार रूपये दंडाची शिक्षा आहे. शहराच्या बहुसंख्य भागांमध्ये गेल्या काही वर्षात सकाळी व सायंकाळीही रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची विक्री सुरू असते. जागेवरच पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी स्वयंपाकाचा किंवा व्यावसायिक गॅस वापरण्यात येतो. यात टाकीचा स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे असे जगताप यांनी सांगितले.
जप्त केलेले सिलेंडर महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत. दंडाची रक्कम जास्त असल्याने बहुसंख्य गाडीचालक सिलेंडर नेण्यासाठी आलेलेच नाहीत अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आणखी काही दिवस वाट पाहून सर्व सिलेंडर्स महापालिका त्यात्या कंपन्यांकडे जमा करणार आहे असे ते म्हणाले. दंड कमी करता येणार नाही, कारण कमी केला की व्यावसायिक पुन्हा त्या जागेवर व्यवसाय सुरू करतात, त्यामुळे कारवाई सुरूच राहणार आहे असे त्यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक यांनी जप्त सिलेंडर्स एकत्रित ठेवताना अतिक्रमण विभागाने काळजी घ्यावी अशी सुचना केली आहे.