मार्केटयार्डात सर्वसामान्य ग्राहकांना बंदी ; घराजवळ उपलब्ध हाेणार भाजीपाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:58 PM2020-03-25T17:58:09+5:302020-03-25T17:59:07+5:30
मार्केटयार्डात आता सामान्य नागरिकांना प्रवेश देण्यात येणार नाही. केवळ किरकाेळ विक्रेत्यांना आत साेडण्यात येणार आहे.
पुणे : पुण्यातील नागरिकांना अत्यावश्यक भाजीपाल व फळे मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये शहरामध्ये प्रभागनिहा नियोजन करण्यात येणार असून, गुलटेकडी मार्केटयार्डात केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे पुढील आदेशापर्यंत सर्वसामान्यांना नागरिकांना मार्केट यार्डातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांना आपल्या भागातच भाजीपाल उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावच्या धास्तीने मार्केट यार्डातील आडत्यांनी बाजार बंदचा निर्णय घेतला. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण देशात लाॅगडाऊन करत असल्याचे जाहिर केले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड पॅनिक परिस्थिती निर्माण झाली व लोकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर भाजीपाल व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली. आडत्यांचा बंद व नागरिकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.25) रोजी बाजार समिती प्रशासन, पुरवठा विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन भाजीपाल, फळे वितरणाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये शेतक-यांना मार्केट यार्डात माल घेऊन येण्यास व तेथून पुण्यातील सर्व लहान मोठ्या किरकोळ विक्रेत्यांना त्या शेतमालाचे वितरण करण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशानाला देण्यात आली आहे. बाजार आवारामध्ये शेतकरी आणि किरकोळ विक्रेत्यांची देखील गर्दी होणार नाही , यासाठी टप्याटप्यांनी बाजार आवारामध्ये सोडण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे आता नागरिकांना आपल्या घरा जवळच्या विक्रेत्यांकडे भाजीपाल उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही स्वरूपात पॅनिक न होता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.