अवैध वाळू वाहतुकीवर बंदी!
By Admin | Published: October 11, 2016 01:57 AM2016-10-11T01:57:33+5:302016-10-11T01:57:33+5:30
बिनबोभाटपणे खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी आता गावानेच पुढाकार घेतला आहे. पाटसच्या ग्रामपंचायत
पाटस : बिनबोभाटपणे खुलेआम बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश आणण्यासाठी आता गावानेच पुढाकार घेतला आहे. पाटसच्या ग्रामपंचायत हद्दीतून बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या गाड्यांवर बंदी आणण्याचा ठराव ग्रामसभेने केला आहे. या गाड्यातील वाळू जप्त करून, ती लिलाव पद्धतीने विक्री करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला राहील, असे गावाने ठरविले.
या ग्रामसभेला सरपंच वैजयंता म्हस्के, उपसरपंच मंगेश दोशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ट्रक आणि वाळू असा ४0 टनांचा बोजा असतो. गावांतर्गत रस्ते करण्यात आलेले असून, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे रस्ते खराब व्हायला लागले आहेत. त्यामुळे काही ग्रामस्थांनी खराब रस्त्यांच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करून, भविष्यात गावातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या गाड्या न येऊ देण्याचा पवित्रा घेतला आहे. यावर ग्रामपंचायतीने सकारात्मक चर्चा करून, याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतलेला आहे; तसेच गावातील काही भागात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी अशुद्ध येत आहे. तेव्हा १५ आॅगस्टला झालेल्या सभेत शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन ग्रामसभेत पाणीपुरवठा समितीने दिले होते; मात्र अद्याप काही भागात अशुद्ध पाणी येत आहे. तेव्हा सदरची योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावी, असाही सूर ग्रामसभेत होता.
‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत हगणदरीमुक्त गाव निर्मल करणे, पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण अंतर्गत स्वत:चे घरकुल बांधण्यास जागा नसलेल्या कुटुंबीयांची यादी गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे.
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ कार्यक्रम, जननी सुरक्षा कार्यक्रम, सावित्रीबाई फुले कन्या योजनेचा आढावा घेणे यांसह विविध विषयांवर या ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. ऐनवेळेच्या विषयात एसटी स्टॅण्डच्या जागेसाठी परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करून, एसटी स्टॅण्ड उभारणे, स्वच्छता अभियान राबविणे, हे ठराव मंजूर करण्यात आले.