प्राणी ठेवण्यास बंदी, मैदानांचे वाढते भाडे, महागाई यामुळे 'सर्कस चालवणे हीच खरी सर्कस'
By नितीश गोवंडे | Published: April 16, 2023 03:28 PM2023-04-16T15:28:15+5:302023-04-16T15:28:56+5:30
शहरात, गावात, मध्यवर्ती गावात सर्कसला परवडेल अशा दरात मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा
पुणे : जागतिक सर्कस दिनानिमित्त जगभर सर्कस कलावंत प्राण्यांसह जल्लोष करत असताना भारतीय सर्कस मात्र प्राण्यांशिवाय उतरणीला लागली आहे, याची खंत वाटते. सर्कसमध्ये प्राणी ठेवण्यास बंदी, मैदानांचे वाढते भाडे आणि महागाई यामुळे सर्कस चालवणे हीच आता सर्कस बनली आहे. सर्कस कलेचा लोप होऊ नये यासाठी केंद्र व राज्यशासनाने प्रयत्न करायला हवे असे मत पुण्याच्या सर्कस मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वाळिंबे यांनी व्यक्त केले. जागतिक सर्कस दिनानिमित्त मुंढवा येथील रॅम्बो सर्कसमध्ये ते बोलत होते.
दरवर्षी युरोपच्या फ्रान्सजवळील मोनॅको या छोट्या देशाची राजधानी मॉन्टे कार्लो येथे जागतिक सर्कस महोत्सवही आयोजित होत असतो. या पार्श्वभूमीवर पुण्यात मुंढवा येथील रॅम्बो सर्कसमध्ये भारतीय सर्कसचे प्रणेते कै. विष्णुपंत छत्रे यांच्या प्रतिमेस विदूषक, कलावंत व सर्कसप्रेमींनी पुष्पहार व फुले अर्पण करून जागतिक सर्कस दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच यानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे देखील उद्घाटन केले. सर्कसमधील विदुषकांच्या हस्ते यावेळी केक देखील कापण्यात आला. यावेळी तन्मयी मेहेंदळे यांनी प्रेक्षकांसमोर ‘जीना यहाँ, मरना यहाँ...’ हे गाणे सदर करून वाह वाह मिळवली.
सर्कस मित्र मंडळचे सरचिटणीस प्रवीण तरवडे यावेळी म्हणाले की, भारतीय सर्कसला १४० वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. आता अनेक कारणांमुळे देशातील सर्कस उद्योग ओहोटीला गेला आहे. त्यामुळेच प्रत्येक शहरात, गावात, मध्यवर्ती गावात सर्कसला परवडेल अशा दरात मैदाने उपलब्ध व्हावीत यासाठी, केंद्र व राज्य शासन तसेच महानगरपालिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या पुढील पिढ्यांना सर्कस प्रत्यक्ष बघता यावी यासाठी सर्कस जगलीच पाहिजे यासाठी शासन व नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे.
सर्कस मित्र मंडळाचे सहसचिव अॅड. आनंद धोत्रे यांनी, आपल्या देशात सर्कसला लोकाश्रय आहे, आता राजाश्रयही मिळाला पाहिजे. कोरोना काळात दोन वर्ष सर्कस बंद होत्या. बहुतांश सर्कस कर्जबाजरी झाल्या आहेत. त्यांना शासनाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे असे मत व्यक्त केले.