शहरात राजकीय-सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रमांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:57+5:302021-03-18T04:11:57+5:30
पुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालल्यामुळे शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. पालिका आयुक्तांनी याबाबतचा आदेश ...
पुणे : शहरातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालल्यामुळे शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. पालिका आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला असून सर्व प्रकारच्या राजकीय-सांस्कृतिक-सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांना अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. तसेच लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांनाच उपस्थित राहण्याची अनुमती दिलेली आहे.
शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ सुरु झाली आहे. संसर्गाचा फैलाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बहुतांश ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरात सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजारांवर पोचली आहे. पालिका आयुक्तांनी मंगळवारी रात्री काढलेल्या आदेशामध्ये गर्दी होणारे कार्यक्रम होणार नाहीत याची दक्षता घेतली आहे.
रुग्ण कमी झाल्याने राजकीय, सांस्कृतिक तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये २०० लोकांच्या उपस्थितीतीला मान्यता दिली आहे. परंतु, त्यापेक्षाही अधिक लोक गर्दी करु लागले आहेत. त्यामुळे सरसकट सर्वच कार्यक्रमांना बंदी घातली आहे. यासोबतच या निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळले आहे.
====
आयुक्तांच्या आदेशामध्ये सर्व कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील असे नमूद केले आहे. परंतु, शासकीय की खासगी याचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर स्पष्टता असणे आवश्यक आहे.
====
महत्वाचे निर्णय
१. प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, बार, फूट कोर्ट यांना रात्री १० पर्यंतच मुभा
२. घरपोच जेवणाची सुविधा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
३. प्रतिबंधात्मक सूचनांची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक
४. धार्मिक स्थळांमधील प्रवेशावर मर्यादा, ऑनलाइन पासची सुविधा
५. लग्नसमारंभासाठी केवळ ५० जणांना उपस्थित राहता येईल.
६. अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी
====
* शहरातील सर्व आस्थापनांमध्ये विनामास्क प्रवेश नाही.
* प्रवेशद्वारावर थर्मामिटर, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर ठेवण्यात यावा.
* हॅन्ड सॅनिटायझर ठेवणे.
* सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे लक्ष देणे.