गडकिल्ल्यांसह धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळांवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:04+5:302021-07-18T04:08:04+5:30
कोरोनामुळे जिल्हाधिकारी यांनी पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घातली असून १४४ कलम लागू केले आहे. यामुळे वेल्हे तालुक्यातील तोरणा, राजगड किल्ला, ...
कोरोनामुळे जिल्हाधिकारी यांनी पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घातली असून १४४ कलम लागू केले आहे. यामुळे वेल्हे तालुक्यातील तोरणा, राजगड किल्ला, मढे घाट, भोर तालुक्यातील रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्ला, भाटघर नीरा देवघर धरण, वरंध घाट, आंबाडखिंड घाट., नागेश्वर मंदिर आंबवडे, राजवाडा येथे पर्यटनास जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भोर तालुक्यात दर वर्षी पावसाळ्यात धबधब्यावर भिजण्यासाठी आणि पर्यटनास वरंध घाट, आंबाडखिंड घाट, भाटघर आणि नीरा देवघर धरणावरही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. सेल्फी काढतात. अशा वेळी होणाऱ्या धावपळीत पाय घसरून पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटना घडू शकतात. गाड्या रस्त्यावर लावल्या जातात. तसेच धिंगाणा घातला जातो. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. मात्र, याकडे पर्यटक दुर्लक्ष करत असतात. या गोष्टींचा विचार करुन भोर तालुका प्रशासनाने तालुक्यात किल्ल्यावर आणि पर्यटनस्थळांवर पर्यटनास बंदी घातली आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तीना वरील ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
चौकट
वरंघ घाट व आंबाडखिडघाट परिसरात पडतात दरडी
भोर तालुक्यात पावसाळयात हिरवेगार डोंगर वृक्ष वेली डोंगरातून फेसाळत पडणारे धबधबे हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील पर्यटक एकच गर्दी करत असतात. मात्र, डोंगरी भाग असल्याने पावसाळ्यात भोर महाड रस्त्यावरील वरंध घाट व भोर मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिंड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी पडतात. यामुळे अनेकदा रस्ता बंद होतो. तर धबधब्यात दगडी पडतात. यातून अपघाताची शक्यता असल्याने पर्यटकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.