गणेशखिंड रस्त्यावर वृक्षतोडीस बंदी; वृक्षप्रेमींच्या लढ्याला अखेर यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:16 PM2017-11-02T13:16:54+5:302017-11-02T13:23:43+5:30
गणेशखिंड रस्ता, औंध जकात नाका ते विद्यापीठ चौकातील कोणतीही झाडे तोडण्यास मनाई करणारा आदेश महापालिकेच्या वृक्ष अधिकार्यांनी जारी केला आहे.
पुणे : वृक्षतोडीचे प्रकरण सर्वसाधारण सभेत गाजल्यानंतर महापालिकेच्या अधिकार्यांना आता जाग आली आहे. गणेशखिंड रस्ता, औंध जकात नाका ते विद्यापीठ चौकातील कोणतीही झाडे तोडण्यास मनाई करणारा आदेश महापालिकेच्या वृक्ष अधिकार्यांनी जारी केला आहे. विशेष म्हणजे हा आदेश महापालिकेच्याच पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना बजावण्यात आला आहे.
पथ विभागाने महापालिकेच्या वृक्ष अधिकार्यांकडे या रस्त्यावरील काही झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी म्हणून परवानगी मागितली होती. या रस्त्याचे काम सुरू असून त्या कामात या वृक्षांचा अडथळा होत होता. वृक्ष अधिकार्यांनी त्यांना काही झाडांच्या फांद्या तसेच वडाच्या पारंब्या तोडण्याची परवानगी दिली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे पथ विभागाकडून या रस्त्यावरील अत्यंत जुनी अशी वड व पिंपळाची झाडे तोडण्यात आली.
त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. सर्वच नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. त्यामुळे आता जागे होत प्रशासनाने यासंबधीचा आदेश काढला आहे. दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या एका जनहित याचिकेनुसार कोणत्याही कामासाठी वड, पिंपळ, नांदुरकी या प्रजातीच्या वृक्षांची तोड करण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिले. एरिया सभा असोसिएशन, पुणे यांच्या वतीने मकरंद देशपांडे, वैशाला पैटकर, स्वप्ना नारायण, माधवी राहिरकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.
आता वृक्ष अधिकार्यांना पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना या आदेशाची कल्पना दिली आहे. त्यात त्यांनी वृक्ष अधिकार्यांनी तुम्हाला फक्त काही फांद्याच तोडण्याची परवानगी दिली होती, याचे स्मरण करून दिले आहे.
यापुढे न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे वड, पिंपळ व नांदुरकी या वृक्षांची तोड करता येणार नसल्याने दिलेली काढून घेत असल्याचे म्हटले आहे. पुणे शहरात कुठेही आता यापुढे वरील प्रजातीचे वृक्ष तोडण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही वृक्ष अधिकार्यांनी पथ विभागाला बजावलेल्या आदेशात म्हटले आहे