विद्यापीठात कार्यक्रम घेण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:20 AM2018-03-28T02:20:21+5:302018-03-28T02:20:21+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनिकेत कँटीन या परिसरात विद्यार्थ्यांनी कोणतेही
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनिकेत कँटीन या परिसरात विद्यार्थ्यांनी कोणतेही कार्यक्रम घेण्यास अथवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आल्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम घेण्यास मज्जाव केला जात आहे. हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे स्पष्ट करून याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन व्यवस्थापन परिषदेचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली. यावेळी एनएसयूआयचे सतीश गोरे, एसएफआयचे सतीश देबडे, मुक्तीवादी संघटनेचे आकाश दोंडे, बीव्हीएमचे जयकर गायकवाड, राष्टÑवादी विद्यार्थी संघटनेचे नंदकुमार हिंगे, डाप्साचे अमोद सरवदे उपस्थित होते. येत्या २ दिवसांत हा निर्णय मागे न घेतल्यास याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाच्या वतीने (एनएसयूआय) शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनिकेत कँटीनजवळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच विद्यापीठातील सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी या ठिकाणी कार्यक्रम घेता येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगितले. व्यवस्थापन परिषदेमध्ये अनिकेत कँटीनजवळ कोणताही कार्यक्रम घेण्यास मनाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद विद्यार्थ्यांमध्ये उमटले आहेत. शांततेमध्ये कार्यक्रम घेण्यासही प्रशासनाकडून अटकाव केला जात असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अनिकेत कँटीनजवळ डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून हुल्लडबाजी करून कार्यक्रम उधळून लावण्याचे प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे उजव्या संघटनांच्या कार्यक्रमाला दुसऱ्या संघटनांकडून विरोध केला जातो. यामुळे यातून सातत्याने वादाचे प्रसंग घडत असल्याने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास मनाईच करण्याचा उपाय विद्यापीठ प्रशासनाने शोधून काढला आहे. विद्यार्थी संघटनांची ही वर्तणूक योग्य नसून त्यांनी त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, अशी भावना प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.