बंडा जोशी यांचा राजीनामा
By admin | Published: March 20, 2017 04:31 AM2017-03-20T04:31:53+5:302017-03-20T04:31:53+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच वार्षिक पारितोषिक विभागाच्या कार्यवाहपदाचा बंडा जोशी यांनी
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच वार्षिक पारितोषिक विभागाच्या कार्यवाहपदाचा बंडा जोशी यांनी अचानक राजीनामा दिल्याने साहित्य वर्तुळाला काहीसा धक्का बसला. अंतर्गत राजकारणामुळे हे घडले असण्याची चर्चा रंगली होती. आमच्यात कोणतेही मतभेद नसून, एकपात्री कार्यक्रमांच्या दौऱ्यामधील व्यस्ततेमुळे परिषदेला म्हणावा तसा वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी बंडा जोशी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या. यासंदर्भात जोशी यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असून, कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, दोन ते तीन महिन्यांपूर्वीच परिषदेच्या कार्याध्यक्षांकडे आपण राजीनाम्याविषयी बोललो होतो. एकपात्री परिषदेसह अनेक संस्थांच्या पदावर मी कार्यशील आहे. या व्यापातही वर्षभर मी काम केले. त्यामुळे पदाच्या राजीनाम्याचे पत्र मी मागच्या बैठकीत दिले. हा राजीनामा अद्यापही स्वीकारलेला नसला तरी 31 मार्चपर्यंतच मी या पदावर राहाणार असून, पर्यायी व्यक्ती शोधण्याचे कार्याध्यक्षांना सांगितले आहे. त्यावर तुम्ही कमी जबाबदारीचे पद घ्या, पण परिषदेत कार्यरत राहा, असा पर्याय त्यांच्यापुढे ठेवला असल्याचे परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)