शिक्रापुरात बांदल वर्चस्वाला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:17+5:302021-01-19T04:14:17+5:30
कोरेगाव भिमा/ शिक्रापूर : जिल्ह्याच्या राजकारणात अनेक मातब्बरांना धोबीपछाड करणा-या शिक्रापुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तेत असणा-या मंगलदास बांदल गटाला चारीमुंड्या ...
कोरेगाव भिमा/ शिक्रापूर :
जिल्ह्याच्या राजकारणात अनेक मातब्बरांना धोबीपछाड करणा-या शिक्रापुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तेत असणा-या मंगलदास बांदल गटाला चारीमुंड्या चीत करित मांढरे-करंजे-जकाते गटाने १०:६ अशी बाजी मारली. बांदलांचा राजकीय वारसदार म्हणून निवडणुकीस उतरणा-या त्यांचा पुतण्या निखील प्रतापराव बांदल व माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्या उमेदवारीने बांदल गटाचे वर्चस्व वाटत असतानाच त्या दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
शिरुर तालुक्याच्या राजकारणात शिक्रापुर ग्रामपंचायतीला वेगळे स्थान राहिले आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत बांदल गटाला ८ विरुध्द ९ असा पराभव पत्करावा लागला असुनही अडिच वर्षात विरोधकांच्या चारीमुंड्या चित करित बांदल गटाने ग्रामपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. आलेली सत्ता आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी मंगलदास बांदल यांनी निवडणुकीत आघाडी घेतली असताना शिक्रापूरचे माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, घोडगंगाचे माजी संचालक अरुण करंजे, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते यांनी यावेळी एकत्र येवून बांदल गटावर १०:६ अशा फरकाने पुन्हा बाजी मारली.
दरम्यान शिक्रापुरच्या राजकारणाचा टर्निंग पॉर्इंट ठरला आहे तो वार्ड क्रमांक १ व ६ यात वार्डामध्ये माजी सरपंच रामभाऊ सासवडे, मंगलदास बांदल यांचे पुतणे निखिल बांदल यांचा पराभव झाला आहे. रामभाऊ सासवडे यांचा उद्योजक मयुर करंजे यांनी तर निखील बांदल यांचा सुभाष खैरे यांनी पराभव केला. ग्रामपंचायतीत १०:६ अशा फरकाने बांदल गटावर वर्चस्व प्रस्थापीत करण्यात करंजे-मांढरे-जकाते गटाला यश आले आहे. तर उषा तानाजी राऊत या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
विजयी उमेदवार :
करंजे-मांढरे-जकाते गट : मयुर करंजे, वंदना भुजबळ, सारीका सासवडे, पुजा दिपक भुजबळ, विशाल खरपुडे, रमेश थोरात, सिमा लांडे, सुभाष खैरे, मोहिनी संतोष मांढरे बांदल गट : कृष्णा सासवडे, मोहिनी युवराज मांढरे, शालन राऊत, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, कवीता टेमगिरे, रमेश गडदे चौकट : पुन्हा एकदा जिल्ह्याच्या नेतृत्वाला धक्का
शिक्रापुर ग्रामपंचायतीच्या राजकारणात महत्वाचे असलेले वार्ड क्रमांक एक व सहा मध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणा-या जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या पुतणे निखील बांदल व रामभाऊ सासवडे यांचा पराभव झाल्याने आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या नेतृत्वाला धक्का पोहोचविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असल्याचे बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे यांनी सांगितले.
शिक्रापुर (ता.शिरुर) येथील करंजे-मांढरे-जकाते गटाचे विजयी सदस्य जल्लोष करताना