Pune: सिंहगड पोलिस ठाण्यातून बांगलादेशी चोरटे पसार; डिपोर्ट करण्यासाठी ठेवले होते ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 07:22 PM2023-06-12T19:22:42+5:302023-06-12T19:23:09+5:30
या प्रकरणी परदेशी नागरिक कायद्यान्वये दोघा बांगलादेशींवर गुन्हा दाखल...
पुणे : चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेले दोन बांगलादेशी नागरिक सिंहगड पोलिस ठाण्याच्या आवारातून पसार झाले. या प्रकरणी परदेशी नागरिक कायद्यान्वये दोघा बांगलादेशींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदानुर रहेमान राकिब (वय ६५, रा. पुरबो हाजीनगर, सारुल्ला, ढाका), जाकीर कोबिद हुसेन (वय ४२, रा. सारोकिया, हाजीपाडा, ता. डमेरा, जि. ढाका) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या गुन्ह्यात दोन बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. येरवडा कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर त्यांची मुक्तता केली होती. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने दिलेल्या ‘रिस्ट्रिक्शन ऑर्डर’नुसार गेले सात महिने बांगलादेशी नागरिक सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात राहत होते. पोलिसांकडून त्यांची जेवण, राहण्याची व्यवस्था केली होती. विशेष शाखेने त्यांना बांगलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. याबाबत बांगलादेशी दूतावासाशी पोलिसांनी संपर्कदेखील साधला होता. मात्र, त्यांच्या दूतावासाने पोलिसांना प्रतिसाद दिला नसल्याने गेले सात महिने बांगलादेशी नागरिक पोलिस ठाण्यात वास्तव्यास होते. ७ जून रोजी ते पोलिस ठाण्यातून पसार झाले.