अवसायानातील बँकांची मालमत्ता विक्री होणार सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:59 PM2018-08-21T14:59:49+5:302018-08-21T15:24:17+5:30
आर्थिक अनियमिततेमुळे राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अवसायनात (लिक्विडेशन) गेल्या आहेत. त्यांचा कारभार सरकारनियुक्त अवसायकामार्फत चालू आहे.
पुणे : अवसायनाला दहा वर्षे पूर्ण झालेल्या बँकांच्या मालमत्ता विक्रीची कार्यवाही आता जलद गतीने होणार आहे. सहकार विभागाने त्यासाठी अवसायक कामकाज संनियंत्रण कक्ष स्थापन केला असून, त्यामार्फत मालमत्ता विक्रीचा आढावा सहकार आयुक्तालयाकडून घेतला जाणार आहे. बँकेच्या मालमत्ता विक्री करुन ठेवीदारांच्या रकमा परत मिळण्याच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहेत.
आर्थिक अनियमिततेमुळे राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अवसायनात (लिक्विडेशन) गेल्या आहेत. त्यांचा कारभार सरकारनियुक्त अवसायकामार्फत चालू आहे. वर्षानुवर्षे या बँकांमध्ये सामान्य नागरिकांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. या बाबत उच्च न्यायालयाने या बँकांच्या मालमत्ता विक्री बाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना सहकार विभागाला दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अवसायनातील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर अवसायन कामकाज संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत बँकांच्या मालमत्ता विक्रीची कार्यवाही आणि त्याची सद्य:स्थिती याचा आढावा घेतला जात आहे. उच्च न्यायालयाने येत्या २३ आॅगस्ट रोजी त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत.
अवसायनातील नागरी सहकारी बँकांच्या स्वमालकीच्या अथवा भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तांच्या विक्रीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यात मालमत्ता विक्रीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यापासूनस मालमत्तेची वाजवी किंमत, लिलाव प्रक्रिया ते खरेदीखत पूर्ण करण्याच्या कार्यवाहीचा समावेश आहे. बँकेचा गाळा, सदनिका, इमारत, मोकळी जागा, जागेचे क्षेत्रफळ, इमारत अथवा इमरातीमधील मजला अशी सर्व माहिती सादर करण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी नागरी सहकारी बँकांच्या सनियंत्रण समितीला दिला आहे. या शिवाय एखाद्या मालमत्तेसंदर्भात न्यायालयात दावा सुरु असल्यास अथवा त्यावर काही निर्णय झाला असल्यास त्याची माहिती देखील कळविण्यात यावी असेही समितीला सांगण्यात आले आहे.
आज आढाव्यासाठी बैठक
मालमत्ता विक्रीच्या कार्यवाहीचा कृती कार्यक्रम, मालमत्ता विक्रीत येणाºया अडचणी या बाबत सहकार आयुक्त कार्यालयाला माहिती देण्याची सूचनाही सहकार आयुक्तांनी या पुर्वी केली आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. २१ आॅगस्ट) सहकार आयुक्तांनी बैठक बोलावली आहे.