ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:42 PM2024-08-01T17:42:58+5:302024-08-01T17:43:53+5:30

एकूण ८४ खातेदारांनी ऑनलाइन गेमच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले असून या प्रकारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची दाट शक्यता

Bank fraud for online game money Crime against 84 people shocking type of rush | ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार

ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार

दौंड : येथील स्टेट बँकेत खाते उघडून ऑनलाइन गेमसाठी बँक खात्याचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केली आहे. दरम्यान लाखो रुपयांचे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दौंड येथील ८४ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकारामुळे चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी स्टेट बँकेचे व्यवस्थापक विपुल जैन यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. दौंड शहरातील ८४ व्यक्तींनी स्टेट बँकेत फॅर्मच्या नावाने करंट अकाउंट वेगवेगळ्या व्यवसायासाठी खाते उघडले होते. या सर्व खात्यांवर वैयक्तिकरीत्या २० ते २५ लाख रुपयांचे व्यवहार सुरू होते. हे व्यवहार गैर मार्गाने होत आहे, ही बाब स्टेट बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर पोलिस आर्थिक गुन्हे शाखेला सदरची माहिती कळवली. त्यानुसार पोलिस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळोवेळी स्टेट बँकेत या सर्व खात्यांची तपासणी केली. साधारणतः हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होता. एकूण ८४ खातेदारांनी ऑनलाइन गेमच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले असल्याचे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ऑनलाइन सावकारीचा आई-वडिलांना त्रास

दौंड शहरात ऑनलाइन जुगार मटका आणि खासगी सावकारी यामुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे. सावकारीतून युवकांना ऑनलाइन पैसे देऊन त्यांच्याकडून दामदुप्पट पैसे वसूल करणे परिणामी त्यांना कर्जबाजारी करणे हा एकमेव व्यवसाय सुरू आहे. तरुणांनी सावकारांकडून घेतलेले पैसे परत दिले नाही तर खासगी सावकार त्यांच्या आई-वडिलांना पैशासाठी त्रास देत असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दरम्यान एका पालकाने या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना लेखी तक्रार केलेली आहे. मात्र पोलिसांनी याची अद्याप दखल न घेतल्याने ऑनलाइन सावकारीसह जुगार मटक्याचा व्यवसाय फोफावत चालला आहे. त्यातूनच गुन्हेगारी वाढत चालली आहे.

असा लागला छडा

काही व्यक्तींच्या खात्यावरून बेकायदेशीर ऑनलाईन व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर १९३० वर संबंधित खातेदारांच्या अकाउंट नंबरसह करण्यात आल्या होत्या. दरम्यान तक्रारीत दिलेल्या बँक खात्यांची वरिष्ठ पातळीवरून शोध घेतला असता ही सर्व खाते दौंड स्टेट बँकेच्या शाखेची निघाली साधारणता या तक्रारी एप्रिल महिन्यात आल्या होत्या. या तक्रारीनुसार या सर्व खातेदारांचे ट्रांजेक्शन बघितले असता ते सर्व बेकायदेशीर निघाले आणि त्यातून हा प्रकार उघडकीस आल्याचे दौंडच्या स्टेट बँकचे व्यवस्थापक विपुल जैन यांनी सांगितले.

दौंड स्टेट बँकेतील काही व्यक्तींनी बँक खात्यावरून बेकायदेशीर ऑनलाईन ट्रांजेक्शन केले असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात तपास सुरू झाला असून या प्रकरणातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.- संतोष डोके, पोलीस निरीक्षक दौंड.

Web Title: Bank fraud for online game money Crime against 84 people shocking type of rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.