बनावट नोटा देऊन बँकेची फसवणूक
By Admin | Published: August 28, 2016 05:20 AM2016-08-28T05:20:50+5:302016-08-28T05:20:50+5:30
खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अज्ञात व्यक्तींनी बनावट नोटा देऊन बँकेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्र करन्सी चेस्ट मंचर
मंचर : खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांतील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत अज्ञात व्यक्तींनी बनावट नोटा देऊन बँकेची फसवणूक केली आहे. महाराष्ट्र करन्सी चेस्ट मंचर येथे सुमारे ७ हजार ३५० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड या तालुक्यांतील बँकेच्या २३ शाखांमधील जमा झालेली कॅश मंचर येथील करन्सी चेस्टमध्ये जमा होते. तेथून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवी मुंबई शाखेत ती जमा केली जाते. करन्सी चेस्टमध्ये जुलै २०१३ दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांच्या ४ बनावट नोटा व ५०० रुपयांच्या २ बनावट नोटा, आॅगस्ट २०१३च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांची १ नोट व ५०० रुपयांची एक बनावट नोट, माहे जुलै २०१४च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपये दराच्या १२ नोटा, ५० रुपयांची एक नोट व ५०० रुपये दराची १ बनावट नोट, माहे जानेवारी २०१५च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांच्या ४ बनावट नोटा व ५०० रुपयांची एक बनावट नोट, नोव्हेबर २०१५च्या दरम्यान भरणा झालेल्या १०० रुपयांच्या १७ बनावट नोटा व ५०० रुपयांच्या २ बनावट नोटा, अशा एकूण ४६ बनावट नोटा भारतीय रिझर्व्ह बॅक सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई यांच्याकडून तपासून आलेल्या व पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांना प्राप्त झालेल्या बनावट नोटा दाखविल्या. बनावट नोटा अज्ञाताने बँकेच्या शिरूर, जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यांतील एकूण २३ शाखांमधील एका शाखेत भरणा केलेल्या आहेत. या बनावट नोटा नक्की कोणत्या शाखेत जमा केल्या व त्या कोणत्या शाखेकडून मंचर करन्सी चेस्टमध्ये प्राप्त झाल्या, याबाबत सांगता येणार नसल्याचे फिर्यादीमध्ये ब्रजेशकुमार बिनोदसिंह यांनी सांगितले. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल करीत आहेत. (वार्ताहर)