एटीएम कार्डद्वारे चोरीचे पैसे बँकांनी द्यावेत! ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळण्याची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:07 AM2017-11-17T06:07:57+5:302017-11-17T06:08:19+5:30
स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे.
पुणे : स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे. अशा प्रकरणात बँकांनी ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावेत, असे पत्र सायबर गुन्हे शाखेने शहरातील बँकांना पाठविले आहे. बँकांनीदेखील त्याला तत्त्वत: मान्यता दिली असल्याने, ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. बनावट एटीएम कार्ड तयार करून ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणा-या टोळीने शहरात धुमाकूळ घातला होता. गेल्या महिन्यात पोलिसांनी या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून विविध बँकांचे कोरे एटीएम कार्ड, एटीएम कार्ड वाचणारे स्कीमर, पिन होल कॅमेरा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने शहरातील दहा विविध एटीएम केंद्रांत असे स्कीमर लावल्याची माहिती समोर आली होती. सायबर गुन्हे शाखेच्या निरीक्षक मनीषा झेंडे म्हणाल्या, की बनावट एटीएम कार्डद्वारे फसवणूक झाल्याप्रकरणी ४४ जणांनी अर्ज केला आहे. त्यांची जवळपास १५ लाख रुपयांची रक्कम बनावट कार्डद्वारे लांबविण्यात आली आहे. यात ग्राहकांचा कोणताही दोष नाही. एटीएम केंद्रावर पुरेशी सुरक्षा न ठेवल्याने ग्राहकांची गोपनीय माहिती चोरट्यांना मिळविता आली. अर्जदारांशी निगडित बँकांना पैसे परत देण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.