१२ मार्चला बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:11+5:302021-03-07T04:11:11+5:30
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचारी येत्या १२ मार्चला एका दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक ...
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रातील कर्मचारी येत्या १२ मार्चला एका दिवसाच्या देशव्यापी लाक्षणिक संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तुळजापूरकर म्हणाले की, देशातील एकोणीसशेपेक्षा अधिकहून शाखांमध्ये काम करणारे सहा हजारांहून अधिक सभासद विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. बँक व्यवस्थापनाने पुरेशी नोकर भरती करावी, ही सभासदांची प्रमुख मागणी आहे.
गेल्या पाच वर्षांत बँकेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणत वाढला आहे. तसेच शाखांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्या प्रमाणात नोकरभरती केलेली नसल्याने कर्मचाऱ्यांचे काम वाढले असून त्यांच्यावरील ताण वाढला आहे. बँकेत अकराशेपेक्षा अधिक सफाई कामगारांच्या जागा रिक्त आहेत. तर हजारांहून अधिक क्लार्कची पदे रिक्त आहेत. बँकेने कंत्राटी कामगार नेमण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे बँकेतील घोळ वाढले असल्याचा आरोप तुळजापूरकर यांनी केला.
त्यांनी सांगितले की, बँक अनेक वर्षांपासूनची चालू असलेली प्रथा मोडत आहे. कर्मचाऱ्यांशी निगडित निर्णय संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत आहे. यावर संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.
चौकट
१५, १६ मार्चला पुन्हा संप
केंद्र सरकारने सहकारी तसेच सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. याच्या विरोधासाठी देशभरातील बँक कर्मचारी येत्या १५ व १६ मार्चला संपावर जाणार असल्याचे युनायटेड फोरम व बँक युनियन या संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. बँकांच्या खासगीकरणामुळे बँक क्षेत्र आकुंचित होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य खातेदाराला त्रास होण्याची शक्यता आहे. खासगी बँका केवळ महानगरांसाठी काम करतात. त्यामुळे ग्रामीण भागाला फटका बसू शकतो, असे देविदास तुळजापूरकर म्हणाले.