बँक आॅफ महाराष्ट्रचा एनपीए १७ हजार कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 07:59 PM2018-08-03T19:59:23+5:302018-08-03T20:04:15+5:30
आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर बँक आॅफ महाराष्ट्राच्या अनुत्पादक खात्यांतील (एनपीए) रक्कम १७ हजार ८०० कोटी रुपये झाली आहे.
पुणे : आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर बँक आॅफ महाराष्ट्राच्या अनुत्पादक खात्यांतील (एनपीए) रक्कम १७ हजार ८०० कोटी रुपये झाली आहे. बँकेच्या संचलन नफ्यात ५३३ वरुन ४७० कोटी रुपयांपर्यंत घट झाली असून, नक्त तोटा १ हजार ११९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याच्या आरोपावरुन बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतरची पहिली तिमाही बैठक शुक्रवारी बँकेच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात पार पडली. यानंतर बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांनी तिमाही अहवाल जाहीर केला. त्यातून बँकेच्या तोट्यात वाढ झाली असल्याची माहिती समोर आली. बँकेच्या दृष्टीने काहीशी जमेची बाब म्हणजे, चालू आणि बचत खात्याचे प्रमाण टिकविण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे.
बँकेतील ग्रॉस एनपीएची रक्कम १७ हजार ८०० कोटी असून, नेट एनपीए ९ हजार १९५ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्रॉस आणि नेट एनपीएमध्ये अनुक्रमे २४९ आणि २ हजार ६४ कोटी रुपयांनी घट झाली आहे. मात्र, बँकेचा संचलन नफा ५३३ कोटी ४८ लाखांवरुन ४७० कोटी ३२ लाखांवर आला आहे. नॉन इंटरेस्ट उत्पन्नातही ४६४ कोटींवरुन ३४६ कोटीरुपयांवर खाली आला आहे. त्यातही १०४ कोटी रुपयांची घट झाली आहे.
अनुत्पादक खात्यांमधून तुलनेने कमी झालेली वसुली आणि इतर तोट्यांमुळे बँकेच्या एकूण तोट्यात वाढ झाली आहे. तसेच, बँकेचा जून २०१७ साली एकूण व्यवसाय २ लाख ३३ हजार ७२४ कोटी रुपयांवरुन २ लाख १९ हजार ४५८ कोटींवर खाली आला आहे. या शिवाय गेल्या जून महिन्याच्या तुलनेत बँकेचा निव्वळ तोटा ४१२.२० कोटी रुपयांवरुन १ हजार ११९ कोटी रुपयांवर गेला आहे.
बँकेचे कार्यकारी संचालक राऊत म्हणाले, बँकिंग क्षेत्राची मोठी रक्कम कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अडकलेली आहे. त्यामुळे पर्सनल वैयक्तिक आणि वाहन लोन यासारखा किरकोळ बँकिंग व्यवसाय, कृषी, मध्यमस्वरुपाचे व्यवसाय यामध्ये पतपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वाहन कर्जात ३७.७ टक्के वाढ झाली असून किरकोळ क्षेत्रातील एकूण पतपुरवठा १६.६० टक्क्यांवरुन १९.९५ टक्के झाला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत थकीत कजार्तून रोख वसुली ८०७ कोटी रुपयांवरुन १ हजार १२४ कोटी रुपये झाली आहे. मात्र, शेतकरी कर्जमाफी, नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलमधील (एनसीएलटी) प्रकरणे आणि गुंतवणुकीवर मिळालेला कमी परतावा यामुळे तोट्यात वाढ दिसत आहे.
.....................
डीएसके कर्ज प्रकरण वैधच
डीएसके कर्जप्रकरणात बोलताना बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले, डीएसके हे १९६९ पासून बँकेचे खातेदार आहेत. यापूर्वी त्यांचे खाते चांगल्या पद्धतीने सुरु होते. त्यांना दिलेले आत्ताचे कर्जदेखील नियमाप्रमाणेच दिले आहे. तसे ते कर्ज पूर्णपणे सुरक्षितच आहे. बँकेने डीएसके यांच्यावर वर्षभरापूर्वीच दिवाळखोरीची कारवाई केली आहे.