खातेदारांना पैसे देण्यास बँकेचा नकार
By Admin | Published: December 22, 2016 11:52 PM2016-12-22T23:52:27+5:302016-12-22T23:52:27+5:30
बँकेत पैसे असतानादेखील येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये चार दिवस ग्राहकांना पैसे देण्यास नकार देण्यात आला. बँकेच्या
शिरूर : बँकेत पैसे असतानादेखील येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये चार दिवस ग्राहकांना पैसे देण्यास नकार देण्यात आला. बँकेच्या व्यवस्थापिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याचे अनेक ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अखेर एका ग्राहकाने थेट मुंबईच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधल्याने आज फक्त दोन हजार रुपये ग्राहकांना देण्यात आले.
ग्राहकांना आज पैसे देण्याचा निर्णयही सहायक व्यवस्थापकाने घेतला. या अधिकाऱ्याच्या या निर्णयावरही शाखा व्यवस्थापिका प्रणोती यांनी नाराजी व्यक्त केली. ‘या अधिकाऱ्याने ग्राहकांना पैसे देण्याचा निर्णय घेतलाय ना; मग आता त्यांनीच तो निस्तरावा,’ असे या व्यवस्थापिका त्यांच्याकडे जाणाऱ्या ग्राहकांना सांगत होत्या. व्यवस्थापिकेच्या या आडमुठेपणाचा बहुतांशी ग्राहकांना अनुभव आला. त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलेल्या ग्राहकांना त्या अरेरावी करून हुसकावून लावत होत्या. ‘कोणाकडे माझी तक्रार करायची, करा’ असे सांगत होत्या.
आज बँकेत ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. १७ डिसेंबरपासून बँकेतून ग्राहकांना पैसे देण्यास नकार मिळत आहे. आज एसटी महामंडळाचे निवृत्त अधिकारी दत्तात्रय कापरे यांनी बँकेच्या मुंबई मुख्य कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला व चार दिवसांपासून बँकेतून पैसे दिले जात नसल्याची तक्रार केली. अधिकाऱ्याने बँकेच्या सहायक व्यवस्थापकाशी संपर्क साधला व ग्राहकांना पैसे द्या, अशी सूचना केली. यावर या सहायक व्यवस्थापकाने व्यवस्थापिका प्रणोती यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेची माहिती दिली. ग्राहकांना आता पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तरीही, व्यवस्थापिकेने यावर नाराजी व्यक्त केली.(वार्ताहर)