पुण्यातील ‘कोरोना संक्रमणशील’ भागातील बँका राहणार बंद : पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 09:22 PM2020-04-15T21:22:13+5:302020-04-15T21:30:35+5:30
अत्यावश्यक आर्थिक सेवा व शासकीय अनुदानाच्या वितरणाशी संबंधित बँकांच्या शाखा निर्धारित वेळेत चालू ठेवता येणार
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील जो भाग "कोरोना प्रतिबंध" म्हणून घोषित केला आहे. त्या क्षेत्रातील सर्व बँक बंद ठेवण्याचे आदेश पुणेपोलिस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बुधवारी दिले आहेत. बँकांनी आपले एटीएम सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे. याशिवाय अत्यावश्यक आर्थिक सेवा व शासकीय अनुदानाच्या वितरणाशी संबंधित बँकांच्या शाखा निर्धारित वेळेत चालू ठेवता येणार असल्याचे असे आदेशात म्हटले आहे.
शहरात कोरोनाचा वाढणारा संसर्ग लक्षात घेऊन प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या शहरातील काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाबाधित क्षेत्रात असणाऱ्या नागरिकांच्या बँकिंग सुविधा सुरळीत चालू राहाव्यात यासाठी बँकांच्या कामकाजाबाबत पोलीस सह आयुक्तांनी स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. त्यात, अत्यावश्यक आर्थिक सेवा व शासकीय अनुदानाच्या वितरणाशी संबंधित बँकांच्या शाखा या काळात चालू ठेवता येणार असून त्यासाठी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक यांनी समन्वय साधून अशा बँक व त्यांच्या शाखा निश्चित कराव्यात. या बँकांची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक पर्यत करण्यात आली आहे. तर अंतर्गत कार्यालयीन कामकाज हे दुपारी एक ते चार यावेळेत सुरू ठेवता येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या 40 टक्के कर्मचारी कामावर हजर राहतील.
बँक प्रशासनाने या कालावधीत कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या आदेशाची प्रत संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावी. कोरोना संक्रमणशिल मनाई आदेशतर्गत कर्मचाऱ्यांच्या संचारावर नियंत्रण आणण्यासाठी कामावर असणारे संबंधित कर्मचारी हे शक्यतो त्याच क्षेत्रातील असावेत. बँक परिसरात ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी बँकांनी खासगी व मान्यताप्राप्त सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे. तसेच शासनाने निर्देश दिलेल्या आरोग्यविषयक सर्व खबरदारीच्या उपायांचे (मास्क, हॅन्ड ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर यांचा वापर करावा. आणि सोशल डिस्टन्स ठेवावे) बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, यांनी आपले ओळखपत्र व आदेशाची प्रत सोबत ठेवावी. जेणेकरुन बंदोबस्तातील पोलिसांनी त्याची विचारणा केल्यास त्यांना दाखवावे. आणि ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरण्याकरिता प्रोत्साहित करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती ही भारतीय दंड विधान संहिता कलम 188, साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदी व प्रचलित कायद्यानुसार शिक्षेस पात्र होईल.
..........
* सील करण्यात आलेली ठिकाणी :
प्रायव्हेट रोड पत्रा चाळ, लिंक क्रमांक 48 , ताडीवाला रोड प्रभाग क्रमांक 20, संपूर्ण ताडीवाला रोड, विकास नगर, बालाजी नगर श्रावस्ती नगर प्रभाग क्रमांक दोन, घोरपडी गाव, राजेवाडी, पदमाजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, एडी कॅप चौक,कॉटर गेट, भवानी पेठ प्रभाग क्रमांक 20 , विकास नगर, वानवडी, ताडीवाला रोड, चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड प्रभाग क्रमांक 26, 28 घोरपडी गाव, संपूर्ण लक्ष्मी नगर, रामनगर, जय जवान नगर, येरवडा प्रभाग क्रमांक 8, मोहम्मद वाडी, हडपसर प्रभाग क्रमांक 23, 24 व 26 पर्वती दर्शन, सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट, मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टँड, पटेल टाइल्स, विक्रम टाइल, ईराणी वस्ती, संपूर्ण पाटील। इस्टेट परिसर, संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाग क्रमांक सात, एन आयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्रमांक 24 परिसर, साई नगर, वडगाव शेरी परिसर प्रभाग क्रमांक पाच, धानोरी प्रभाग क्रमांक एक, येरवडा प्रभाग क्रमांक सहा.