पुणे शहरातील हॉटस्पॉट भागातील बँका बंदच... एटीएम राहणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:10 PM2020-05-06T19:10:50+5:302020-05-06T19:11:14+5:30
नॉन कंटेन्मेंट भागात सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यत चालणार काम
पुणेः शहरातील कोरोना अतिसंक्रमशील भागातील बँका बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने काढले आहेत. या क्षेत्रातील सर्व बँकाना त्यांच्या शाखा बंद ठेवाव्या लागणार आहेत. मात्र त्यांना त्यांची एटीएम सेंटर चालू ठेवता येणार आहेत. अपरिहार्य कारणे, शासकीय अनुदान यासंबंधित कामकाजासाठी शासनाच्या आदेशाचे पालन व्हावे असा देखील उल्लेख करण्यात आला आहे. तर संक्रमणशील क्षेत्रातील वरील भाग वगळता इतर (नॉन कन्टेन्टमेंट परिसर) मधील बँक ग्राहकांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत बँका सुरू राहणार आहे.
कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन मधील काही अटी अंशतः शिथील करून काही व्यवसायासह इतर सेवांना देखील सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये बँका सुरू करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबाबत एक नियमावली पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अतिसंक्रमणशील क्षेत्र वगळून अशी नियमावली आहे. संक्रमणशील क्षेत्रातील वरील भाग वगळता इतर (नॉन कन्टेन्टमेंट परिसर) मधील बँक ग्राहकांसाठी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत बँका सुरू राहतील. त्यानंतर दुपारी दोन ते पाच पर्यंत अंतर्गत कार्यालयीन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना बँका सुरू ठेवता येतील. कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाच्या पन्नास टक्के कर्मचारी कामावर हजर राहू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे नॉन कन्टेन्टमेंट क्षेत्रामधील शाखेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे कन्टेन्टमेंट क्षेत्रामध्ये वास्तव्यस असणारे नसावेत. दरम्यान ज्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. शासनाकडून बँकेच्या कामकाजाबाबत वेगळे निर्देश प्राप्त झाल्यास शहर पोलिस आयुक्तालयाकडील हे आदेश संपुष्टात येतील. असे आदेशात म्हटले आहे.
अशी असेल नवी नियमावली...
- बँक परिसरात गर्दी टाळण्यासाठी खासगी व मान्यताप्राप्त सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे.
- आरोग्यविषयक सर्व खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य
- बँक आस्थापना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांयकाळी सात पर्यंत वास्तव्याच्या ठिकाणी पोहचावे.
- बँक प्रशासनाने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नेमणूकीच्या आदेशाची प्रत संबंधीत कर्मचाऱ्यांना द्यावी.
- सर्व संबंधितानी अधिकृत ओळखपत्र व आदेशाची प्रत जवळ बाळगावी.