बँकांतील चलन ‘वळण’ सुरू

By admin | Published: December 29, 2016 03:23 AM2016-12-29T03:23:46+5:302016-12-29T03:23:46+5:30

नोटाबंदीच्या निर्णयानंतर, बँकेत जुन्या नोटा भरणे अथवा नवीन नोटा बदलून घेण्यासाठीच गेले दीड महिना सुरू असलेली गर्दी आता ओसरू लागली आहे. बँकांतून बाहेर

Banks' turn 'currency' started | बँकांतील चलन ‘वळण’ सुरू

बँकांतील चलन ‘वळण’ सुरू

Next

पुणे : नोटाबंदीच्या निर्णयानंतर, बँकेत जुन्या नोटा भरणे अथवा नवीन नोटा बदलून घेण्यासाठीच गेले दीड महिना सुरू असलेली गर्दी आता ओसरू लागली आहे. बँकांतून बाहेर गेलेल्या नवीन चलनी नोटा पुन्हा बँकेत भरल्या जात नव्हत्या; मात्र बाजारातील नवीन चलनाने पुन्हा बँकांतील विविध खात्यात पुन्हा वळण घेतले असल्याने नोटगर्दी ओसरली आहे.
नोटाबंदीनंतर बँका व सुरू असलेल्या तुरळक एटीएम केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळली होती. नागरिकांना आपला नंबर येण्यासाठी अनेक ठिकाणी दोन ते तीन तास रांगेत
उभे राहावे लागत होते. ‘आरबीआय’ने ९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या काळात ५ लाख ९२ हजार ६१३ कोटी
रुपये मूल्याच्या २२.६ अब्ज नोटा वितरित केल्या होत्या. आता हा आकडा सहा लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. त्यानंतरही नवीन नोटा मिळविण्यासाठी गर्दी कायम असल्याचे चित्र शहरात दिसत होते.
गेल्या काही दिवसांपासून बँका व एटीएम केंद्रांबाहेर दिसत असलेल्या गर्दीत कमालीची घट झाली असल्याचे दिसून येत आहे; तसेच ठप्प झालेला व्यवहारदेखील पुन्हा सुरुळीत होत आहेत. सुट्या चलनाअभावी पैसे खर्च न करण्याकडे नागरिकांचा कल होता; मात्र आता बाजारातील चलनवलन काही प्रमाणात वाढले असल्याने, बँकांत नवीन चलन भरण्यासाठी काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. व्यापारी व व्यावसायिकांचे प्रमाण यात अधिक असले, तरी बँकांमधे चलनाचा उलट प्रवास सुरू झाल्याने विविध बँक अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे म्हणाले की, अजूनही बँकांचा कारभार पूर्ववत होण्याइतपत नवीन चलन बँकेला उपलब्ध होत नाही; मात्र बँकांमध्ये नवीन चलनाचा भरणा करण्यास आता सुरुवात झाली आहे. हे प्रमाण सामान्य स्थितीपेक्षा तीस टक्के इतके आहे. बँकांतील चलनवलन सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांच्या खात्यात नवीन चलनाचा भरणा सर्वाधिक होत आहे. अजूनही फारशी एटीएम केंदेसुरू नाहीत. तुरळक सुरू असलेल्या एटीएम केंद्रांवरील गर्दीही आता आटोक्यात आली असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी एटीएमच्या रांगेत तास-दोन तास लागत असतील, तर आता साधारणत: वीस मिनिटेच रांगेत राहावे लागत आहे.

बँकांना सामान्यत: दैनंदिन व्यवहारासाठी जितके चलन आवश्यक असते, त्याच्या चाळीस टक्केच चलनाची उपलब्धता होत आहे. बँकांची स्थिती सामान्य होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागेल. पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात एटीएम केंद्र आता सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत आणखी अधिक प्रमाणात एटीएम सुरू होतील. नवीन चलनाची उपलब्धता अधिक झाल्यास स्थितीत लवकर सुधार होईल.
- मिलिंद काळे,
चेअरमन, कॉसमॉस बँक

आठवड्याला चोवीस हजारांचा निर्णय कागदावरच
केंद्र सरकारने बचत खात्यातून आठवड्याला चोवीस हजार, तर चालू खात्यातून पन्नास हजार रुपये काढता येतील, असा निर्णय घेतला; मात्र चलनाच्या उपलब्धते अभावी कोणत्याच बँकेला आठवड्याला २४ हजार रुपये देणे शक्य झाले नाही. बहुतांश बँकांकडून पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत रक्कम देत आहेत. अत्यल्प सुरु असलेल्या एटीएम केंद्रांतून दोन हजार रुपयेच काढण्याची मर्यादा आहे.

ई-वॉलेटची चलती...
नोटाबंदीमुळे केंद्र सरकारने ‘ई- व्यवहारा’ला चालना देण्याचे धोरण स्वीकारले. ई-व्यवहारांना चालना देण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ योजना देखील जाहीर करण्यात आली आहे. व्यवसाय करणे सोयीचे जावे, यासाठी शहरातील काही चांभार काम करणाऱ्या व्यक्तींपासून भाजी विक्रेते, विविध व्यावसायिक, हॉटेलचालक, रिक्षा व्यावसायिकांनीदेखील स्वाइप मशिन, पेटीएमसारख्या ई-वॉलेटचा वापर करण्यास सुरुवात केली. बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी विविध बँकांनी, ग्राहकांनी ई-मनी ट्रान्स्फर करण्यावर भर द्यावा व डेबिट-क्रेडिटकार्ड वापरण्याचे आवाहन केले आहे.

सहकारी व जिल्हा बँकांची कोंडी
नवीन चलनी नोटा सहकारी व जिल्हा मध्यवर्ती बँकेतून वितरित करण्यावर एक प्रकारे बंदीच असल्याची स्थिती निर्माण झाली. त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांना, तर जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारण्यावर देखील बंदी घातल्याने ग्रामीण भागातील नवीन चलनी नोटा वितरणावर मर्यादा पडल्या. पतसंस्थांची स्थितीदेखील अशीच होती. सुरुवातीस सहकारी बँकांना नसलेली परवानगी नंतर देण्यात आली.
पुन्हा दोन दिवसांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे या बँकांच्या संघटनांनी न्यायालयात धाव घेतली; मात्र अजूनही जिल्हा बँकांना परवानगी देण्यात आली नाही, तर नागरी सहकारी बँकांना त्यांच्या करन्सी चेस्टमधून अगदी अत्यल्प रक्कम दिली जात आहे. त्यामुळे नागरी बँकांना आपल्या खातेदारांना पाचशे ते दोन हजार रुपयांची रक्कमच देण्यात येत आहे.

Web Title: Banks' turn 'currency' started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.