एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या..., पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 04:17 PM2022-05-26T16:17:58+5:302022-05-26T16:18:43+5:30
चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत
पुणे : चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यावरून पाटलांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात बॅनरबाजी करून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.
भाजपने काढलेल्या मोर्च्यात बोलताना भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी खासदार सुप्रिया सुळेंवर तीव्र शब्दांत टीका केली होती. 'कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असे म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला जात आहे. पुण्यातही रुपाली पाटील यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांना प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. तर सदानंद सुळे यांनी सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यायवर ट्विट केले आहे. या सर्व घडामोडीत पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात बॅनरबाजी दिसून आली आहे. पुण्यात पाषाण सुस रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत.
एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? असा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात आलेला आहे. तर पुढे हॅश टॅग चंपावाणी असा जाहीर निषेध बॅनर लावून सुप्रिया सुळे यांच्या बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा साई चौक सुस रोड, पाषाण येथे जाहीर निषेध करण्यात आला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले, 'कशासाठी राजकारणात राहता, घरी जा घरी, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची असते? कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं? आता घरी जाण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असे पाटील यांनी म्हटले आहे.